अमरावती : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनाबाबत शासन सकारात्मक असून, दोनशे खाटांच्या अतिरिक्त इमारतीसाठी निधीही दिला जाणार आहे. तो लवकरच प्राप्त होईल. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्यास मदत होईल, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी शनिवारी दिली.
स्त्री रुग्णालयाच्या श्रेणीवर्धन करण्याबाबत पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन दिले होते. त्याचप्रमाणे, पालकमंत्री ठाकूर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह वित्तमंत्री पवार, आरोग्य मंत्री टोपे यांच्याशी प्रत्यक्ष भेटूनही चर्चा केली. हे काम लवकरच मार्गी लागणार असून स्त्री रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनाबाबत शासन सकारात्मक आहे, असे पालकमंत्री ठाकूर यांनी सांगितले.
अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालय दोनशे खाटांचे आहे. आता अतिरिक्त २०० खाटांचे रुग्णालय मंजूर झाले असून, त्यासाठी ४५ कोटी ६१ लाख ५८ हजार रुपये निधीला शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. सदर काम प्रगतीपथावर असून, १० कोटी १० लक्ष रुपये निधी खर्च झाला आहे. तर, उर्वरित निधी उपलब्ध करून देण्याबाबत तसेच सध्या सुरू असलेल्या २०० खाटांच्या दुरुस्तीकामासाठी ५१ लक्ष रुपये निधी देण्याबाबत मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती.
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय ४०० खाटांचे होत असून, त्यासाठीचा कर्मचारी आकृतीबंध अद्यापपर्यंत मंजूर झालेला नाही. याबाबतचा प्रस्ताव आरोग्य विभागाने सादर केलेला आहे. तसेच विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय टप्पा दोन इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. त्यासाठी लागणारी आवश्यक उपकरणे व साहित्य सामग्री अप्राप्त असल्यामुळे रुग्णालय सुरू होण्यासाठी विलंब होत आहे. त्यामुळे निधी देण्याची व आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याची मागणी पालकमंत्री ठाकूर यांनी केली.
हेही वाचा - कंगना राणावतच्या मुंबईवरील वक्तव्यावर शिवसेना आक्रामक, चांदूर रेल्वे येथे निषेध