अमरावती - मागील आठवड्यात चिखलदारा तालुक्यातील मोथा गावातून एक दुर्दैवी बातमी समोर आली. हंडाभर पाणी आणायला गेलेल्या पंधरा वर्षीय मनिषाची १० दिवसांपासून सुरू असलेली मृत्यशी झुंझ अखेर संपली. आरोग्य योजनेचा गाजावाजा करणाऱ्या एकाही योजनेचा तिला फायदा झाला नाही. गावकऱ्यांनी तिच्यासाठी लोकवर्गणी केली, पण नियती पुढे काहीच चालले नाही. ही दुर्दैवी कहाणी आहे मेळघातील आदिवासी कुटुंबातील मनीषा धांडेकरची.
अमरावती शहरापासून जवळपास ७० किलोमीटर अंतरावर आणि चिखलदारावरून परतवाडा रोडवर ७ किलोमीटर अंतरावर मोथा गाव आहे. सातशे लोकसंख्येच्या या गावात गवळी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. याच गावात गुंडभर पाण्यासाठी मनिषाला आपला जीव गमवावा लागला आहे.
यावर्षी मेळघाटात भीषण पाणी टंचाई आहे. मोथा गावालाही पाणी टंचाईचे चटके खावे लागत आहे. गावात एक विहीर आहे. त्या विहिरीत टँकरने पाणी सोडल्यानंतर गावकरी तेथून दूरवर पाणी नेतात अशातच मनिषाही एक गुंड पाणी आणायला गेली होती. अचानक ती विहिरीत पडली आणि डोक्याला जबर मार लागल्याने तिची जगण्याची धडपड सुरू झाली. हातावर पोट असणाऱ्या या कुटुंबाने तिला चिखलदाराला नेले. तेथून अमरावतीला, पण डोक्याला मार जास्त असल्याने तिला नागपूरला भरती करावे लागले. तिथे तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, गावकऱ्यांनी आपल्या परीने पैसे जमा केले. पण नशीबापुढे गावकऱ्यांची मदत अन् प्रार्थनाही कामी आली नाही.
धांडेकर कुटुंबाकडे जमीन नाही, राहायला पक्क घर नाही, घरकूल योजनेचा लाभ नाही, अशा परिस्थितीत मिळेल ते काम करून हे कुटुंब गुजराण करते. भीषण पाणीटंचाईने मनिषाचा बळी घेतल्यानंतरही तिच्या वेदना संपल्या नव्हत्या. तिचा मृतदेह घरी आणण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागला. एवढी वाईट परिस्थिती या कुटुंबाची आहे.
शासनाकडून मेळघाट सारख्या दुर्गम भागासाठी लाखो रुपये खर्च केल्याच्या पोकळ घोषणा केल्या जातात. पण वास्तविक स्थिती मात्र खूप वेगळी आहे. गुंडभर पाण्यासाठी जीव गमावणाऱ्या मनिषाच्या कुटुंबाला साधी भेट द्यायची तसदीही इथल्या राजकीय व्यवस्थेतला आली नाही.