अमरावती - शहरातील गेटलाईफ रुग्णालय आता कोरोनाचा हॉटस्पॉट बनले आहे. या रुग्णालयात वेगळ्या आजारासाठी दाखल दोन रुग्णांना कोरोना असल्यामुळे रुग्णालयातील सात परिचरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. रुग्णालयातील सर्व डॉक्टरांसह सर्व कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून या रुग्णालयातील आणखी काही जणांचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रुख्मिणी नगर परिसरात असणाऱ्या गेटलाईफ रुग्णालयातील यशोदानगर लगत बेनोडा परिसरात राहणाऱ्या परिचरिकेला कोरोना झाल्याचे 2 जूनला समोर आले होते. 3 जून रोजी याच रुग्णालयातील तीन परिचारिका कोरोनाबाधित असल्याचे समोर येताच खळबळ उडाली. या तिघींपैकी दोघीजणी यशोदानगर परिसरातील रहिवासी होत्या तर एक परिचारिका ही रुख्मिणी नगर परिसरात भाड्याने राहते.
दरम्यान रुख्मिणी परिसरातील 62 वर्षाचा व्यक्ती आजारामुळे या रुग्णालयात दाखल झाला होता. गेटलाईफ रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली होती. अतिदक्षता विभागात असणाऱ्या या रुग्णाला 2 जून रोजी उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात दाखल केले होते. नागपूर येथे या रुग्णाचे स्वॅब घेण्यात आल्यावर 3 जून रोजी त्यांना कोरोना असल्याचा अहवाल आला. यानंतर गेट लाईफ रुग्णालयात चांगलीच खळबळ उडाली. यापूर्वी या रुग्णालयात शोभा नगर परिसरातील एक व्यक्ती दाखल असता त्याला कोरोना असल्याचा अहवाल आला होता. दरम्यान गेट लाईफ रुग्णालयात दोन कोरोना रुग्णांवर वेगळ्या आजारांवर उपचार करण्यात आल्यामुळे या दोघांच्या संपर्कात आलेल्या परिचारिका डॉक्टर, इतर कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेऊन त्यांना 3 जूनपासून विलगिकरण कक्षात हलविण्यात आले असून रुग्णालय बंद करण्यात आले आहे.
शुक्रवारी या रुग्णालयातील आणखी तीन परिचरिका कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. गेट लाईफ रुग्णालय कोरोनाचा हॉटस्पॉट ठरले आहे. महापालिका प्रशासनाने गेट लाईफ रुग्णालय परिसरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, छोट्या व्यवसायिकांच्या हात गाड्या आदी बंद केल्या आहेत. रुग्णालयातील आणखी काही डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येण्याची शक्यता आहे.