अमरावती - मोर्शी तालुक्यातील नेर पिंगळाई या गावात गंगाधर स्वामी मठात एक हजार वर्षांपासून श्री गणेश स्थापनेची परंपरा आहे. गुरु आणी शिष्याचा गणपती म्हणून हा गणपती संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे.
नेर पिंगळाई हे गाव अमरावती शहरापासून ४५ किलोमीटर अंतरावर आहे. या गावात इ.स. ९६३ मध्ये स्थापन झालेला गुरु गंगाधर स्वामी मठ आजही अस्तित्वात आहे. या मठाला गणपती मठ म्हणूनच ओळखले जाते.
हेही वाचा - अमरावतीतील चुनाभट्टी परिसरात हाणामारी, नगरसेवकासह दोघे जखमी
वीरशैव पंथाच्या काशी आणि उज्जैन येथील मठांशी नेर पिंगळाईचा मठ संलग्न आहे. मठातील गणपतीची मूर्ती मातीची असल्याने पर्यावरण पूरक आहे. गणेशोत्सवा दरम्यान हजारो भाविक दर्शन घेण्याकरता नेर पिंगळाई या गावात येतात.
मात्र, या प्राचीन मठाची तटबंदी धासळायला सुरुवात झाली आहे. ११०० वर्षापूर्वीच्या प्राचीन मठ असलेल्या या गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी गावकऱ्यांची धडपड सुरु आहे. पुरातन विभागामार्फत या ११०० वर्षां पूर्वीच्या मठाची निगा राखण्यात यावी, अशी मागणी गावातील नागरिक करत आहेत.