अमरावती - नाल्याच्या पुलावरील पाणी वाढल्यामुळे व चालकाचा अंदाज चुकल्याने गाडी नाल्यात कोसळल्याची घटना गुरूवारी चांदूररेल्वे शहरातील पळसखेड मार्गावर घडली. यामध्ये टवेरातील चालकासह अमरावती येथील बिसमोरे कुटूंबातील ६ लोकांचे प्राण वाचले आहे. नाल्याजवळ असलेल्या ओम साई पाईप प्रॉडक्शन कंपनीतील कर्मचाऱ्यांनी गाडीतील प्राण वाचविले.
अमरावतीमधील चपरासीपुरा येथील कुणाल बिसमोरे यांच्या परिवारातील ५ सदस्य व चालक असे ६ लोकं टवेरा गाडी (क्र. एमएच २६ व्ही २२८५) ने अमरावतीवरून वर्धाकडे चांदूररेल्वे मार्गे जात होते. अशातच ते पळसखेड मार्गावरील रेल्वे अंडरब्रीज खालून वर्धा बायपासकडे गेले होते. मात्र समोरील रस्ता बंद असल्यामुळे ते परत त्याच मार्गाने रेल्वे अंडरब्रीजकडे परत येत होते. दरम्यान ओम साई पाईप प्रॉडक्शन कंपनी जवळील नाल्यामधील आणि रस्त्याचे पाणी समान झाल्यामुळे नाल्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे टवेरा गाडी सरळ नाल्यात कोसळली. गाडी पाण्यात डूबत असल्याचे लक्षात येताच पाईप कंपनीतील कर्मचारी निकिता श्रीवास, शुभम माने, पियूष बोबडे, सुयेश चौधरी, श्रेयश चौधरी व इतर काही मजूर धावून आले. आणि गाडीतील ४ पुरूष व २ महिला अशा सर्व ६ लोकांना बाहेर काढण्यास मदत केली. त्यामुळे सर्वांचे प्राण वाचले व सुदैवाने जीवितहानी झाली नाही. यानंतर पाण्यात अडकलेली गाडी सुरूवातीला जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु जेसीबीने गाडी न निघाल्याने क्रेन बोलाविण्यात आली. पाणी उतरल्यानंतर क्रेनच्या सहाय्याने सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान गाडी बाहेर काढण्यात आली.