अमरावती : तळेगाव दशासर येथे 15 जानेवारीपासून शंकरपटाला सुरूवात झाली आहे. काल रात्री शंकरपट पाहून आपल्या घराकडे परत जाणाऱ्या दुचाकीवरील युवकाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिल्याने तो जागीच ठार झाला आहे. काल रात्री तळेगाव दशासर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा अपघात झाला.
शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल : सोमवारी या शंकरपटातील बैलांच्या शर्यती पाहून पुलगाव तालुक्यातील बोदवड मलकापूर येथे घरी परतणाऱ्या आशिष दिनकर ईरपाते वय २५ व त्याचा मित्र अक्षय गजेंद्र शिंदे वय २८ यांच्या दुचाकीला देवगावजवळील अग्रवाल यांच्या शेताजवळ ट्रकने धडक दिली. यात आशिष जागीच ठार झाला, तर अक्षय गंभीर जखमी आहे. तळेगाव पोलीस ठाण्याचे गजेंद्र ठाकरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी अक्षयला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
देवगावजवळ तीन ठार : देवगावजवळ कारने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांसह कारचालक जागीच ठार झाले. दोघेही मृत पिंपळखुंटा येथील रहिवासी आहेत. संतोष वय 30 असे एका मृताचे नाव असून दुसऱ्या युवकच्या हातावर प्रदीप असे गोंदलेले आहे. मृत कारचालकाचे नाव श्रीकांत पवार वय २२, राहणार अंगाईत, तालुका मोर्शी असल्याचे पोलिसांनी सांगितले. कार ही देवगाववरून जात होती. दुचाकी यवतमाळवरून धामणगावकडे येत होती. देवगावजवळील पाटेकर यांच्या शेताजवळ हा अपघात घडला. या घटनेचा अधिक तपास तळेगाव दशासर पोलीस निरीक्षक हेमंत चौधरी व सहायक पोलीस निरीक्षक मिश्रा करीत आहे.
शंकरपटावर बंदी उठवली : धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर हे शंकर पटासाठी प्रसिध्द आहे. येथील शंकरपटाला मोठा इतिहास आहे. हा शंकरपट विदर्भात प्रसिध्द आहे. परंतु ९ वर्षांपूर्वी या शंकरपटावर न्यायालयाने बंदी घातली होती. त्यामुळे हा शंकरपट बंद करण्यात आला होता. परंतु परंपरा असलेला हा शंकरपट पुन्हा एकदा सुरू करावा यासाठी विद्यमान आमदार प्रताप अडसड यांनी हिवाळी अधिवेशनात राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन शंकरपट पुन्हा एकदा सुरू करावा अशी मागणी केली. विखे पाटील यांनी अडसड यांच्या मागणीची दखल घेऊन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना शंकरपट सुरू करण्यात यावा असे पत्र दिल्याची माहिती आहे.
आजी माजी आमदारांच्या प्रयत्नाला फळ : विद्यमान आमदार प्रताप अडसड तसेच माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी शंकरपट सुरू व्हावा यासाठी पुढाकार घेतला होता. शंकर पटावरील बंदी हटवली नाही. शंकरपट ज्या ठिकाणी भरणार होता, त्या जागेची आमदाराच्यावतीने पाहणी करण्यात आली होती.
हेही वाचा : Delhi Police ASI causes accident: दिल्ली पोलिसांच्या एएसआयचा अपघात, सहा गाड्यांना दिली धडक