अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने विधी शाखेच्या चौथ्या सत्राचा आज दुसरा पेपर होता. विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था या परीक्षा केंद्रावर भाजपचा माजी नगरसेवक प्रणित सोनी हा परीक्षार्थी म्हणून या परीक्षा केंद्रात परीक्षा द्यायला आला होता. त्याने परीक्षा केंद्रावरून व्हाट्सअपद्वारे प्रश्नपत्रिका बाहेर मित्राला पाठवली. मित्राने प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची उत्तरे लिहून पुन्हा प्रणित सोनीला व्हाट्सअपवर पाठवली. या संपूर्ण प्रकरणाची माहिती परीक्षा केंद्र बाहेर वाऱ्यासारखी पसरली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य भैय्यासाहेब मेटकर यांनी परीक्षा केंद्रावर धाव घेतली, असता हा संपूर्ण गंभीर प्रकार उजेडात आला.
आज गाडगे नगर पोलिसांचा ताफा विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था या परीक्षा केंद्रावर पोहोचला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रभारी परीक्षा नियंत्रक देखील परीक्षा केंद्रावर पोहोचल्या. प्रणित सोनी याच्यासह परीक्षा केंद्रात त्याच्या अगदी मागे बसलेला त्याचा मित्र भूषण हरकुट व्हाट्सअपवर आलेल्या प्रश्नांच्या उत्तराद्वारे उत्तर पत्रिकेत कॉपी करीत असल्याचे स्पष्ट झाले - भैय्यासाहेब मेटकर, व्यवस्थापन परिषद सदस्य
दोघांच्याही वर्गखोल्या वेगळ्या, मात्र बसले एकामागे एक : भाजपचा माजी नगरसेवक प्रणित सोनी, त्याचा मित्र भाजपचा कार्यकर्ता भूषण हरकुट या दोघांचेही बैठक क्रमांक हे वेगवेगळ्या खोलीत आहे. मात्र असे असताना हे दोघेही उत्तर पत्रिका सोडविण्यासाठी एकाच खोलीत एकामागे एक बसले होते. या ठिकाणी मी स्वतः पाहणी केली असता हा गंभीर प्रकार समोर आला असून विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत इतका गंभीर प्रकार कसा काय झाला याबाबत मी शंका उपस्थित केली. प्राचार्यांनी या संदर्भात तात्काळ पोलिसात तक्रार द्यावी, अशा सूचना मी दिल्या आहे. जर प्राचार्यांनी पोलिसात या गंभीर प्रकाराची तक्रार दिली नाही, तर आम्ही संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्याद्वारे संबंधित संस्थेविरोधात पोलीस तक्रार देणार असे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य भैय्यासाहेब मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
पोलिसांनी केली अटक : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे अधिकारी विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था या परीक्षा केंद्रावर दाखल झाल्यावर त्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली. हा प्रकार अतिशय गंभीर असल्याचे लक्षात आल्यावर परीक्षा केंद्रप्रमुखांनी संबंधित प्रकाराची तक्रार गाडगे नगर पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी प्रणित सोनी, भूषण हरकोट या दोघांसह त्यांनी ज्या युवकाला व्हाट्सअपवर प्रश्नपत्रिका पाठवली होती त्याला पोलिसांनी अटक केली.
हेही वाचा -