अमरावती - पाकिस्ताननंतर राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश मार्गे महाराष्ट्रात टोळधाड दाखल झाली आहे. या टोळधाडीने अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान केले आहे. मात्र, कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात केवळ ५० हेक्टर पिकांचे नुकसान झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. इतक्या कमी क्षेत्राचे नुकसान करायला टोळधाड ही पर्यटनाला आली होती का? असा सवाल माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी प्रशासनाला केला आहे.
पाच दिवसांपूर्वी मध्यप्रदेशच्या सीमेवरून आलेल्या कोट्यवधी टोळधाड कीटकांच्या समूहाने नागपूर, वर्धा, आणि अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी परिसरातील पिकांवर आक्रमक केले. मोठ्या प्रमाणात पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
दरम्यान, प्रशासच्यावतीने तयार करण्यात आलेल्या नुकसानीच्या अहवालात केवळ 50 हेक्टर नुकसानीची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. टोळधाड कीटक हे राष्ट्रीय आपत्तीत येत असल्याने नुकसान झालेल्या भागाची पुन्हा पाहणी करून अहवाल तयार करावा. कमी क्षेत्र बाधित दाखवायला लाखोंच्या संख्येने आलेली टोळधाड ही केवळ पर्यटन करायला आली होती का? अशी संतप्त प्रतिक्रिया माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी व्यक्त केली आहे.