अमरावती - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये संपूर्ण राज्यामध्ये मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून रुग्णांवर उपचारासाठी भरीव मदत दिली जात होती. विदर्भातील रुग्णांसाठी नागपूर येथे मुख्यमंत्री साहाय्यता निधीचे विशेष केंद्र फडणवीसांनी सुरू केले होते. महाविकास आघाडीने नागपूरचे मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्ष बंद केले आहे. त्याचा पहिला फटका विदर्भातील रुग्णांना बसला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने विदर्भातील रुग्णांवर अन्याय केला असल्याचा आरोप माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला.
फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री साहाय्यता निधीमधून यकृताचे आजार, अंधत्वाचे आजार, कर्करोग, बहिरेपणा इत्यादी आजारांसाठी भरीव मदत दिली जात होती. ९०० कोटी रुपयांच्यावर आर्थिक मदतीने रुग्णांना दिलासा दिला होता. विदर्भातील रुग्णांना व नातेवाईकांना मुंबईत मंत्रालयामध्ये चकरा मारणे शक्य नसल्याने फडणवीस यांनी नागपूरलाच मुख्यमंत्री साहाय्यता निधीचे केंद्र व निर्णय प्रक्रिया कार्यालय निर्माण केले होते. आघाडी सरकारद्वारे हे केंद्र बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता सर्व रुग्णांना व नातेवाईकांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीचे अर्ज मंत्रालय मुंबई येथे पाठवावे लागत आहे.
हे वाचलं का? - 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यलय' मुंबईमध्ये स्थलांतरित झाल्याने विदर्भातील जनतेला त्रास होणार नाही - नितीन राऊत
मंत्रालयात मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षामध्ये कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आलेली आहे. त्यामुळे विदर्भातील रुग्णांना वेळेत मदत मिळणे शक्य होत नाही. अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया या निधीअभावी प्रलंबित आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने पहिला आसूड विदर्भातील रुग्णांवर ओढलेला आहे. विदर्भातील रुग्ण मंत्रालयात चकरा मारू शकत नसल्याने उपचाराविना तडफडतो आहे. मुख्यमंत्री साहाय्यता निधीचे केंद्र व निर्णय प्रक्रिया कार्यालय विदर्भातच नागपूरला पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी बोंडे यांनी केली आहे.