अमरावती - कुत्र्यांची शिकार करण्यासाठी पाठलाग करणारा बिबट्या कुत्र्यासह विहिरीत पडल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. येथील कोंडेश्वर परिसरातील राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरातल्या विहिरीत पडलेला बिबट्या आणि कुत्रा शनिवारी सकाळी आढळून आला.त्यानंतर ग्रामस्थांनी या घनटेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनकर्मचाऱ्यांनी या दोन्ही प्राण्याची विहिरीच्या पाण्यातून सुटका केली आहे.
वन विभागाचे बचाव पथक दाखल
विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती मिळताच वनविभाचे बचाव पथक तायडे यांच्या शेतात पोहोचले. बचाव पथकाचे प्रमुख वनरक्षक अमोल गावनेर, वन मजूर सतीश उमक, मनोज ठाकूर, रोजंदारी मजूर वैभव राऊत, आसिफ पठाण यांनी विहिरीतील बिबट बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी वडाळी वन परिक्षेत्र अधिकारी कैलास भुम्बर हे सुद्धा तायडे यांच्या शेतशिवरात पोहोचले.
बिबट्या पाहण्यासाठी विहिरीवर गाव-
कोंडेश्वर आणि बडनेरा परिसराच्या लागत असणाऱ्या मनोहर तायडे यांच्या शेतात बिबट पडल्याची माहिती गावात पसरली. त्यानंतर सर्वत्र पसरताच बडनेरा परिसरातील शेकडो नागरिकांची गर्दी बिबट पाहण्यासाठी उसळली. दरम्यान बडनेरा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गर्दीला पांगविण्याचा प्रयत्न केला.