अमरावती - काँग्रेसची अंतर्गत गटबाजी विकोपाला गेल्याने महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्या समर्थ आणि विरोधकांमध्ये पठाण चौकात हाणामारी झाली. हे दृश्य पाहून नवनीत राणांना रडू कोसळले. त्यांना प्रचार सोडून नाईलाजाने चारचाकीतून माघारी फिरावे लागले.
नवनीत राणा रविवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास काँग्रेसच्या माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्यासह पठाण चौक परिसरात पोहोचल्या होत्या. यावेळी माजी नगरसेवक आसिफ तावक्कल यांनी रावसाहेब शेखावतांना सोबत का आणले म्हणून नवनीत राणा यांच्याशी वाद घातला. रावसाहेब शेखावत कारच्या खाली उतरल्यावर आसिफ तवक्कल व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शेखावतांना शिवीगाळ करीत वाद घातला.
आसिफ तावक्कल व त्यांचे साथीदार हे रावसाहेब शेखावत यांच्याशी हुज्जत घालीत होते. ही माहिती मिळताच शेखावत समर्थक एजाज मामु आणि त्यांचे कार्यकर्ते पठाण चौकात धावून आले. यावेळी आसिफ तावक्कल आणि एजाज मामु यांच्या गटात हाणामारी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोचला. या सर्व गोंधळामुळे नवनीत राणा या रडत चारचाकीत बसल्या. नवनीत राणा आणि रावसाहेब शेखावत हे पठाण चौकात सुरू असलेल्या गोंधळातून निघून गेले.
यामुळे आहे दोन गटामध्ये वाद-
आसिफ तावक्कल आणि एजाज मामु यांच्या गटात वाद आहे. एजाज मामु यांना शहर काँग्रेस महत्त्व देत असल्याने आसिफ तावक्कल यांचा रावसाहेब शेखावत यांच्यावर रोष आहे. नवनीत राणा यांनी प्रचारासाठी शेखावतांना सोबत आणल्याने आसिफ तावक्कल यांचा रोष उफाळून आल्याने गोंधळ उडाला.