अमरावती - मेळघाटात धुमाकूळ घालणाऱ्या 'ई-वन' वाघिणीलाअखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. अमरावतीच्या धारणी तालुक्यातील जवळपास 40 गावात दहशत घातली होती. या वाघिणीने अनेक जनावरांना फस्त केले होते. तर, शुक्रवारी एका व्यक्तीवर हल्ला करून त्याचा बळी घेतला होता. रविवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास गोलाई जंगलात बेशुध्द करून जेरबंद केल्याची माहिती समोर आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथून मेळघाट व्याघ्र प्रकल्पात या वाघिणीला आणले होते. या ''ई-वन' वाघिणीने मागील दोन महिन्यांपासून अमरावतीच्या धारणी तालुक्यातील जवळपास 40 गावात धुमाकुळ घातला होता. बैलावर, म्हशींच्या कळपावर, बकऱ्यांवर हल्ले केले होते. एका लहान मुलीवर आणि त्यानंतर शुक्रवारी एका व्यक्तीवर या वाघिणीने जीवघेणा हल्ला करून बळी घेतल्या नंतर संतप्त गावकऱ्यांनी या वाघिणीला जेरबंद करण्याची मागणी केली होती.
खासदार नवनीत राणांसह इतर राजकीय नेत्यांनी सुध्दा या वाघिणीला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी केली होती. त्या नंतर वन विभागाने या वाघिणीला जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या 'ई-वन' वाघिणीला पकडण्यासाठी विशेष तीन पथके मेळघाटात दाखल झाली होती. या तिन्ही पथकाला ही वाघीण गोलाई जंगलात असल्याची खात्रीलायक माहिती होती. त्यानंतर वाघिणीचा शोध घेतल्यानंतर तिला बेशुध्द करून रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास जेरबंद करण्यात आले.