अमरावती - जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मोझरी परिसरातील 7 हजार 109 हेक्टर शेतजमिन गुरुकुंज उपसा सिंचनाच्या योजनेच्या माध्यमातून पाण्याखाली आणून शेतकऱ्यांना समृद्ध करणाऱ्या बहुप्रतिक्षित गुरुकुंज मोझरी उपसा सिंचन योजनेचे पाणी अखेर 1 हजार 615 हेक्टर शेतजमिनीवर पोहोचले. या योजनेचे शनिवारी (दि. 27) पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जलपूजन केले. दरम्यान, जलसंपदा विभागाने पाणी सोडून ट्रायल घेण्याच्या घाईत या ट्रायलमुळे शेंदोळा खुर्द भागातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात पाणी सोडले. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आता शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी होत आहे.
गुरुकुंज उपसा सिंचन योजनेमुळे 18 हजार एकर जमिन सिंचनाखाली येणार असून, परिसरातील कृषी उत्पादकता वाढेल व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे. हजारो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार, असे मत जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी कार्यक्रमानिमित्त केले होते.
हा बहुप्रतिक्षित प्रकल्प असून या सिंचन प्रकल्पाचे काम लवकरच पूर्ण होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. शनिवारी पालकमंत्री यांच्या उपस्थित सिंचनातून सोडलेले पाणी शेतकऱ्यांच्या उभ्या पिका गेल्याने पराटी, हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसाठी वरदान असलेल्या याच योजनेमुळे आज शेंदोळा खुर्द तसेच इतर भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
हे ही वाचा - बहुप्रतिक्षित मोझरी उपसा सिंचन योजनेचे पाणी पोहचले शेतात; मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले जलपूजन