अमरावती - काढणीला आलेल्या गव्हाला शॉर्ट सर्कीटने आग लागल्याने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले. ही घटना देवगाव रोडवरील खेल कृष्णाजी शेत शिवारात घडली. पंढरी बळीराम राऊत असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, की अंजनगाव सुर्जी येथील पंढरी राऊत यांचे देवगाव रोडवर शेत असून त्यांनी मोठ्या मेहनतीने अडीच एकर गहू पेरला होता. सध्यस्थितीत गहू काढणीला आला होता. उद्यापासून गहू कापणीला मजूर सुद्धा सांगितले होते.
आज दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान अचानक शेतातून गेलेल्या 11 के. व्ही. बंद विद्युत लाईनवर एल. टी. लाईनच्या तारांचा हवेने स्पर्श झाला. त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन आगीच्या ठिणग्या खाली पडल्या. शेतातील उभ्या काढणीला आलेल्या गव्हाने पेट घेतला. त्यामुळे अडीच एकरातील अर्धा गहू जळून खाक झाला. याबाबतची माहिती मिळताच नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे जवान तात्काळ आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आली. त्यामुळे अर्धा गहू जळण्यापासून वाचला. यामध्ये शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले. आधीच संकटात असलेला शेतकरी पुन्हा संकटात असून सदर शेतकरी नुकसान भरपाईची मागणी करत आहे. याप्रकरणी पोलीस तथा वीज मंडळाचे अधिकारी पुढील चौकशी करत आहेत.