अमरावती : Bacchu Kadu : सध्या विविध समाजांना आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन मोर्चे सुरू आहेत. मात्र या सर्व धामधुमीत राज्यातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नाकडे सरकार हवे तसे गांभीर्याने लक्ष देत नाही. (Farm Labourers) यामुळे आता आम्ही शेतकरी आणि मजुरांना आर्थिक आरक्षण मिळावे यासाठी मागणी करणार असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी आज अमरावतीत पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले. (Bachchu Kadu Amravati PC)
प्रभू रामाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार: 'मेरी माटी मेरा खून' हे अभियान आम्ही राबवत आहोत. त्याअंतर्गत 29 ऑक्टोबरला प्रभू श्रीरामचंद्राच्या दर्शनासाठी मी अयोध्येला जाणार असल्याचे आमदार बच्चू कडू म्हणाले. प्रभू श्रीरामचंद्रांना आम्ही ऊस, कापूस, धान आणि संत्र्याचा प्रसाद चढवणार असून अयोध्येत असणारे मौलाना आणि एका पुजाऱ्याला इंग्रजांनी तेथील एका झाडावर एकाच वेळी फासावर लटकवले होते. त्या ठिकाणाला देखील आम्ही भेट देणार. अयोध्येला प्रभू श्री श्रीरामचंद्रांच्या भक्तीचे पीठ आहे. तर शहीद झालेल्या अमर अली आणि क्रांतिवीर मोहन चरणदास यांचे शक्तिपीठ देखील अयोध्येत असल्याचे आमदार बच्चू कडू म्हणाले.
पाकिस्तान नव्हे इंग्लंड खरा शत्रू: इंग्रजांनी भारतावर अनेक वर्ष राज्य केले. यादरम्यान एक कोटी भारतीयांना इंग्रजांनी ठार मारले. आधी ईस्ट इंडिया कंपनी आणि त्यानंतर थेट ब्रिटिश साम्राज्य भारतात आले. ब्रिटिशांनी भारताची प्रचंड आर्थिक लूट केली. छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार इंग्रजांनी नेली आणि तुकारामांची गाथा देखील आज इंग्लंडमध्येच आहे. खरंतर आज आपण पाकिस्तानला आपला शत्रू मानतो. मात्र, खरा शत्रू हा इंग्लंडच असल्याचे बच्चू कडू म्हणाले.
संत्र्याच्या प्रश्नावर दोन्ही खासदारांनी बोलावे: अमरावती जिल्ह्यातील संत्र्याच्या प्रश्नावर खरंतर खासदार डॉक्टर अनिल बोंडे आणि सभागृहात अतिशय चांगल्या प्रश्न मांडणाऱ्या खासदार नवनीत राणा यांनी कधीतरी बोलावे आणि जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांचे दुःख सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे देखील आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आम्ही जेव्हा आंदोलन छेडू तेव्हा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी संत्रा नेऊ, असे देखील आमदार बच्चू कडू म्हणाले.
हेही वाचा: