अमरावती - गेल्या तीन वर्षांपासून असलेला कर्करोग, वारंवार होणारी नापिकी, यावर्षी आलेलं दुबार पेरणीचे संकट, त्यात आजारावर उपचारासाठी पत्नीने काढलेल कर्ज या सर्व बाबींमुळे त्रस्त झालेल्या एका अल्पभूधारक शेतकऱ्याने त्याच्याच शेतातील विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली.
हा दुर्दैवी प्रकार अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील ढाकुलगाव या गावात घडला. राजू रामचंद्र बुरघाटे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
राजू यांच्याकडे एक एकर शेती आहे. या शेतीच्या भरवशावर कुटुंबाचा खर्च भागत नसल्याने ते मोलमजुरी करत होते. दरम्यान, तीन वर्षांपूर्वी त्यांना कर्करोग आजाराचे निदान झाले. मागील तीन वर्षात त्यांच्या आजारावर जवळपास तीन लाख रुपये खर्च झाले. अशातच शेतात दुबार पेरणीचे संकट आले. त्यांच्या उपचारासाठी व शेतीसाठी लोकांकडून व बेसिकचे आणलेले कर्ज आता फेडावे तरी कसे? या विवंचनेत राजू यांनी आज सकाळी शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
त्यांच्यामागे शिक्षण घेणारी दोन मुले आणि पत्नी असा परिवार आहे. घरचा कर्ता पुरुष गेल्याने बुरघाटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सरकारकडून त्यांना मदतीची अपेक्षा आहे.