अमरावती - शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ पाटील हे आजपासून (रविवार) पाच दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसान झालेल्या पीकांची ते पाहणी करणार आहे. दरम्यान रघुनाथ पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारवर हल्लाबोल करत आगामी काळात मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला. राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना लुटले आहे. राज्याचे मंत्री व नेते बांधावर जाऊन शेतीच्या नुकसानीची पाहणी करत आहे व शेतकऱ्यांना फक्त आश्वासन देत आहे. मात्र आश्वासनाची कधीच पूर्तता होत नाही. राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना भिकारी केले आहे. निसर्गाच्या अवकृपामुळे शेती व शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीसाठी आंदोलन करू, अशी माहिती रघुनाथ पाटील यांनी दिली आहे.
विदर्भ ही सोन्याची खान आहे, असे पूर्वी आम्ही म्हणायचो. या विदर्भात सहज पाऊस यायचा दोन पीक घेतले जायचे. पण आता ग्लोबल वार्मिंगमुळे तापमान वाढले आणि याचे फटके विदर्भातील शेतकऱ्यांना बसु लागले आहेत. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना यांनी ब्रिटिशांप्रमाणे शेतकऱ्यांची लुटालूट केली आहे. सध्या सरकारकडून दौरे करत फक्त थापा मारण्याचे काम सुरू आहे, अशी टीकाही रघुनाथ पाटील यांनी केली आहे.
'...म्हणून आंदोलने करावे लागतात'
आंदोलन केल्याशिवाय राज्य सरकारला जाग येत नाही. गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे. यांच्यासमोर निवेदन देऊन काहीही होत नाही. आतापर्यंत अनेक शेतकरी पोलिसांच्या गोळीबारात आपले जीव गमावलेस, तरीसुद्धा आम्ही भीत नाही. शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई तातडीने झाली पाहीजे, असेही पाटील म्हणाले. शेतकरी संघटनेने आतापर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अनेक अधिकाऱ्यांचे कार्यालय फोडले, मंत्र्यांच्या गाड्या फोडल्या मंत्र्यांना गावबंदी केली. आम्ही सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्न आवाज उठत असतो. सरकारने तत्काळ मदत दिली पाहिजे, असे रघुनाथ पाटील यांनी सांगितले आहे.
'या' कारणामुळे शिवसेना गप्प असेल'
विमा कंपनीबद्दल शिवसेनेचा हेतू साध्य झाला असेल म्हणून ते बोलत नाही, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांना विमा पाहिजे असेल तर विमा कंपनी निवडण्याच स्वातंत्र्य हे दिले पाहिजे. राज्यकर्ते स्वतःच्या फायद्यासाठी विमा कंपन्यांना जिल्हे वाटून देतात, असा गंभीर आरोप रघुनाथ पाटील यांनी केला आहे. भाजपाने दहा दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी मारले तर यापूर्वी काँग्रेसनेही एका आंदोलनात शेतकरी संघटनेचे 12 शेतकरी गोळ्या घालून मारले होते. त्यामुळे भाजपा आणि काँग्रेस दोन्ही एकाच आईचे लेकरू आहे, असेही रघुनाथ पाटील म्हणाले.
हेही वाचा - कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष - अशोक चव्हाण