अमरावती- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेला लॉकडाऊन हा शेतकऱ्यांच्या जणू मुळावरच उठला आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील बग्गी येथील एका शेतकऱ्याच्या 2 एकरातील कवळ्याच्या पिकाला ग्राहक नसल्याने फेकुन देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. लॉकडाऊनच्या काळात विक्री अभावी सर्व माल जाग्यावरच सडून जात आहे.
चांदूर रेल्वे तालुक्यातील बग्गी येथील शेतकरी प्रशांत हरिभाऊ मोहोड यांनी त्यांच्या 2 एकरात पेपो कवळ्याचे संकरित वाण 26 जानेवारी रोजी लावले होते. यानंतर त्यांना उत्पादन भरपूर प्रमाणात आले. मात्र,कोरोना संकटात हे पीक सापडल्यामुळे पीकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून ह्या शेतकर्यांच्या कोवळ्याला खरेदी करण्यासाठी व्यापारी, ग्राहक मिळत नसल्याने ह्या पिकाचे लावलेले पैसै सुध्दा शेतकर्याच्या खिशात पडणार नसल्याचे दिसून येत आहे.
लागवडीसाठी मोहोड यांना 35 हजार रूपयांचा खर्च आला असुन अपेक्षित उत्पन्न 1 लाख 30 हजारांचे होते. परंतु शेतामध्ये आपल्या मुला-बाळांना प्रमाणे जोपसलेले पिक खराब होत असुन मोठ्या कष्टाने पदरात न पडलेल्या पिकाची ही अवस्था पाहून प्रशांत मोहोड यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. संचारबंदी व लॉकडाऊन लागू केले असल्यामुळे दळणवळण, मोठ्या आडत बंद झाल्या असल्याने त्याचा परिणाम थेट शेतकऱ्यांवरती पडला आहे.
सुरूवातीला सोयाबीन पाण्यामुळे सडल्यामुळे पीक हातात आले नाही. तुरीचे पिक चांगले झाल्यानंतर ही कवळ्याची शेती केली. मात्र उत्पादन समाधानकारक झाल्यानंतर कोरोनामुळे मार्केट बंद असल्यामुळे माल विकला गेला नाही. आता उरलेल्या कवळ्याच्या पिकांवर शेतात रोटावेटर मारण्याची वेळ आली असून शासनाने मला मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी प्रशांत मोहोड यांनी केली.