अमरावती - जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात येणाऱ्या वणी येथील 45 वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे चांदूरबाजार तालुक्यात खळबळ उडाली असून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आल्याचे या घटनेद्वारे पुन्हा समोर आले आहे.
शुक्रवारी सकाळपासून होता बेपत्ता
चांदूरबाजार तालुक्यातील वणी येथील संजय जनार्दन राऊत (वय 45 वर्षे) शुक्रवारी सकाळपासूनच घरातून बेपत्ता होते. यामुळे घरातील सदस्यांनी तसेच गावातील नागरिकांनी संजय राऊत यांना सर्वत्र शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा कुठेच पत्ता लागला नाही. अखेर बाळू कोठाळे यांचे शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. मात्र, रात्रीच्या अंधारात मृतदेह काढण्यासाठी अडचण होत असल्याने शनिवारी (दि. 13 मार्च) सकाळी विहिरीतून मृतदेह काढण्यात आला.
कर्जबाजरी असल्याने केली आत्महत्या
मृत संजय राऊत यांच्याकडे केवळ तीन एकर शेती असून यावरच त्यांच्या परिवारचा उदरनिर्वाह चालतो. त्यांचा शेतात सततची नापिकी, तसेच वाढत्या कर्जाला कंटाळून संजय राऊत यांनी आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चांदूरबाजार ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. शेतकरी संजय राऊत यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे.
हेही वाचा - अमरावती-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; दोन शेतकऱ्यांचा मृत्यू