अमरावती - दोन आठवड्यांपासून पाऊस गायब झाल्याने जिल्ह्यातील पिके करपत आहेत. कर्ज काढून मोठ्या हिंमतीने शेती पेरूनसुद्धा उगवलेले बियाणे पाण्याअभावी करपू लागल्याने व्यथित झालेल्या एका शेतकऱ्याने आपल्या १२ एकर शेतातील पिकांवरून ट्रॅक्टर फिरवला आहे. ही घटना दर्यापूर तालुक्यातील धामोडी गावात घडली आहे. प्रशांत गावंडे असे पीक मोडणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
प्रशांत गावंडे यांनी यावर्षी आपल्या शेतात मूग आणि तुरीची पेरणी केली होती. पेरणीही समाधानकारक झाली. मात्र, पावसाने दडी दिल्याने त्यांच्या शेतातील पीक करपू लागले होते. यामुळे त्यांनी हे पीक ट्रॅक्टर फिरवून मोडून टाकले. त्यांच्यावर आता दुबार पेरणीचे संकट आले आहे.
मूग, तुरीचे पीक करपत असल्याने अखेर ते मोडण्याचा निर्णय या शेतकऱ्याने घेतला. दीड लाख रुपये उसनवारी घेऊन या शेतकऱ्याने पेरणी केली होती. त्यामुळे सरकारने पंचनामा करून मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.