अमरावती - मेळघाटातील नानाविध वैशिष्ट्यांपैकी मेळघाटातील विश्रामगृह आपली विशेष अशी ओळख राखून आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सिपना आणि गुगामाल वन्यजीव विभागातील व्याघ्र संरक्षित क्षेत्रात असणाऱ्या तारुबांदा या घनदाट जंगलात वसलेल्या गावात उंच पहाडावर असणारे विश्रामगृह हे इंग्रजकालीन विश्रामगृह आहे. पावसाच्या पाण्याची साठवण करणारे केंद्र अशी या विश्रामगृहाची ओळख आहे.
मेळघाटातील सर्वात उंचावर असणाऱ्या विश्रामगृहापैकी एक असे तारुबांदा येथील विश्रामगृह आहे. इंग्रजांच्या काळात दोन दालन असणारे हे विश्रामगृह उभारण्यात आले. हे विश्रामगृह वनविभागाच्या अधिकारात असून उंचावर असणाऱ्या या भागात बाराही महिने पाण्याची टंचाई राहते. पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी विश्रामगृहाचे बांधकाम करताना विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारालगत दोन्ही बाजूला 45 हजार लिटर क्षमता असणाऱ्या टाक्यांची निर्मिती केली आहे. विश्रामगृहाच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी या टाक्यांमध्ये पडेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. पावसाळ्यात या भागात मुसळधार पाऊस कोसळतो. पावसाच्या पाण्याने टाकी भरताच हे पाणी विश्रामगृहात 8 महिने वापरले जाते.
तारुबांदा येथील विश्रामगृहाच्या खालच्या भागातून साखरी नदी वाहते. विश्रामगृहालगतच्या जंगल परिसरात कन्द्री बाबांचे प्रसिद्ध मंदिर आहे. यासह लगतच्या भागात छोटे मोठे प्रेक्षणीय स्थळ आहेत. तारुबांदा गावालगत घनदाट जंगल आहे. या परिसरातील उंच भागावर विश्रामगृहाची जागा निश्चित करणे हे अतिशय महत्वाचे कार्य इंग्रज शासन काळात दूरदृष्टी ठेऊन करण्यात आले आहे. या विश्रामगृहात एक रात्र घालविणे ही पर्यटकांसाठी खास पर्वणी आहे. या विश्रामगृहात राहण्यासाठी अमरावती आणि परतवाडा येथील पर्यटकांना संकुलात आगाऊ नोंदणी करावी लागते. निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या या विश्रामगृहात जो क्षण अनुभवयास येतो तो आयुष्यभर न विसरता येणार असाच आहे.