अमरावती - नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने जागतिक नेत्रदान दिनानिमित्ताने अमरावती शहरात राजकल ते जयस्तंभ चौकापर्यंत दिव्यांची आरास लावण्यात आली. जिल्हा सामान्य रुग्णालय आणि हरिना फाउंडेशनच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात आला.
राजकमल चौक येथे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी या उपक्रमाचे उद्घाटन केले. शहरातील विविध सामाजिक, विद्यार्थी, वैद्यकीय संघटना या उपक्रमात सहभागी झाल्या. यावेळी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, उपमहापौर संध्या टिकले, पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम, माजी खासदार अनंत गुढे, माजी आमदार रावसाहेब शेखावत, माजी महापौर विलास इंगोले यांनी राजकमल ते जयस्तंभ चौकापर्यंत लावलेल्या दिव्यांच्या ठिकाणी भेट दिली. 'मृत्यू नंतर जग पाहण्यासाठी नेत्रदान करा', 'नेत्रहिनांना दृष्टी मिळावी यासाठी नेत्रदान करा' असा संदेश यावेळी देण्यात आला.