अमरावती - विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या 'लेखणी बंद' आंदोलनाची दखल शासनाने घेतली नसताना आता गुरुवारपासून विद्यापीठ कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून होणाऱ्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा पुन्हा लांबणीवर गेल्या आहेत. आता नेट आणि एमपीएससी परीक्षेनंतरच विद्यापीठ परीक्षांचे नवे वेळापत्रक तयार होईल.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी 24 सप्टेंबरपासून लेखणी बंद आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे विद्यापीठाचे सर्वच काम ठप्प पडले आहे. कोरोनामुळे आधीच परीक्षेबाबत अनेक अडचणी निर्माण झाल्या असताना आता केवळ पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्याच परीक्षा घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घेण्यात आला. त्यानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने 1 ऑक्टोबरपासून परीक्षा घेण्याची पूर्ण तयारी केली होती. सातवा वेतन आयोग लागू व्हावा, यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन छेडल्याने विद्यापीठाच्या कामावर याचा विपरीत परिणाम झाला आहे.
हेही वाचा - रस्ते निर्मितीसाठी उभारण्यात आलेल्या खडी क्रशरमुळे शेकडो एकर शेतीचे नुकसान
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने गुरुवारपासून सुरू होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले असले तरी मनुष्यबळाशिवाय परीक्षा घेणे व इतर कामे शक्य नाहीत, असे कुलगुरू म्हणाले. विद्यार्थ्यांनी खचू नये, अभ्यास सुरू ठेवावा लवकरच परीक्षेचे नवे वेळापत्रक येईल, असेही कुलगुरूंनी स्पष्ट केले.