अमरावती - लोकसभा मतदारसंघातील निवडणूक गुरुवारी १८ एप्रिलला पार पडल्यावर शुक्रवारी सायंकाळपर्यंत बडनेरा मार्गावरील नेमानी गोडाऊन येथील स्ट्राँगरूममध्ये २ हजार मतदान केंद्रावरील ईव्हीएम सील करून ठेवण्यात आल्या आहेत. मतमोजणीच्या दिवशी २३ एप्रिललाच ईव्हीएमचे सील काढण्यात येणार आहे. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त नेमानी गोडाऊनला असणार आहे.
गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यावर अमरावती आणि बडनेरा विधानसभा क्षेत्रातील ईव्हीएम नेमाणी गोडाऊन येथील स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. शुक्रवारी पहाटे ३ वाजता शहरालगत असणाऱ्या मतदारसंघातील ईव्हीएम स्ट्राँगरूमला पोहोचल्या. यावेळी ईव्हीएम आणणाऱ्या ट्रकला जीपीआरएस यंत्रणा लावण्यात आली होती.
एकूण ३४ दिवस ईव्हीएम स्ट्राँगरूमध्ये सशस्त्र जवानांच्या निगराणीत असतील. या स्ट्राँगरूमला पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रत्येकी एक तुकडीसह ३ पोलीस निरीक्षक, ६ पोलीस उपनिरीक्षक आणि ४० कर्मचारी असा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नेमाणी गोडाऊन परिसरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.