अमरावती - लोकसभा निवडणूक प्रचारात महाराष्ट नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सत्तारूढ महायुतीच्या विरोधात रान उठवत अनेक आरोपांच्या फैरी झाडल्या. त्यात देशातील पहिले डिजिटल गाव असणाऱ्या मेळघाटातील हरिसालचाही उदोउदो झाला. हरिसाल राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले. यानंतर 'ईटीव्ही भारत'ने प्रत्यक्ष हरिसालला भेट देत परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावरुन दुर्गम आदिवासी भाग असणाऱ्या हरिसालमध्ये 'डिजिटल इम्पॅक्ट' जाणवतो ही वस्तुस्थिती आहे, असे आमच्या निदर्शनास आले.
अमरावती शहरापासून सुमारे ११५ किलोमीटर अंतरावर सातपुडा पर्वतरांगेत धारणी मार्गावर हरिसाल गाव वसलेले आहे. २०१६ साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राबविलेल्या डिजिटल व्हिलेज योजनेतंर्गत हरिसालला देशातील पहिले डिजिटल व्हिलेज होण्याचा मान मिळाला. २०१६ पूर्वी गावात मोबाईल फोन आले. मात्र, या फोनसाठी नेटवर्क शोधायला धारणी किंवा लगतच्या मेळघाटातील मोबाईल टॉवरचा शोध घेत ग्रामस्थांना शेकडो मैल अंतर फिरावे लागायचे. हरिसाल डिजिटल होताच गावात मोबाईल टॉवर तर उभारला गेलाच मात्र सोबतच गावात सर्वत्र वायफाय सुविधाही उपलब्ध झाली.
हरिसालला आल्यावर 'जल्दीफाय' या कंपनीने उपलब्ध करून दिलेल्या मोफत वायफाय साठी रजिस्ट्रेशन करावे लागते. गावातील माणसं गावात येणाऱ्या पाहुण्यांना वायफायसाठी मोठ्या आनंदाने रजिस्ट्रेशन करून देतात आणि 'साहेब सुरू झाला ना इंटरनेट, लागतो ना आता आमच्या गावातून कॉल' असे विचारणाही करतात. हरिसालमध्ये 'वायफाय' सुविधा हवी असेल तर एक अट आहे. ज्यांच्याकडे आयडिया कंपनीचे सीमकार्ड आहे त्यांना डिजिटल हरिसाल अनुभवता येते अन्यथा मेळघाटातील इतर गावांप्रमाणेच हरिसालमध्येही इंटरनेटचे जग शोधूनही सापडणे नाही.
सर्व विद्यार्थ्यांना टॅब दिल्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा फोल -
शासकीय शाळेत अद्ययावत कॉम्प्युटर लॅब आहे. एकमात्र खरे की, मुख्यमंत्र्यांनी हरिसालमध्ये सर्व विद्यार्थ्यांना टॅब दिला असल्याचे ट्विट केले असले तरी हरिसालच्या शाळेत केवळ २ टॅब आहेत. हे टॅब विद्यार्थी हाताळत नसून शिक्षक टॅबद्वारे विद्यार्थ्यांना माहिती देतात, असे येथील विद्यार्थी आणि शिक्षकांनीच 'ईटीव्ही भारत'शी बोलताना स्पष्ट केले.
निवडणूक रणधुमाळीत राज ठाकरे यांनी हरिसाल डिजिटल झाले नाही असा जो आरोप केला तो येथील रहिवाशांच्या जिव्हारी लागला असल्याचे स्थानिकांनी बोलताना सांगितले. हरिसालचे उपसरपंच गणेश येवले यांनी राज ठाकरे यांचा हरिसालबाबतचा आरोप चुकीचा असून २०१६ पूर्वीचे हरिसाल आणि आजचे हरिसाल यात मोठा बदल जाणवतो आहे. अगदी सगळेच जरी बदलले नसले तरी नव्या बदलांकडे हरिसालची वाटचाल सुरू असल्याचे गणेश येवले यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
'काही दिवसांपूर्वी आमच्या गावला कोणी विचारत नसे आज गावात जमिनीचे भाव १० लाखांवर गेले आहेत. ही सर्व किमया हरिसाल डिजिटल होत असल्याची आहे', गावातील एक वृद्ध व्यक्तीने सांगितले. ७०० कुटुंबांचे वास्तव्य असणाऱ्या हरिसालची लोकसंख्या १७०० आहे. या गावात स्टेट बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र बँकेची एक शाखा आहे. हरिसालमध्ये प्रत्येक कुटुंबाकडे एटीएम कार्ड आहे. ७८ जण व्यवहारासाठी नेट बँकिंगचा वापर करतात. ८६ जणांकडे भीम अॅप आहे. अमेझॉनवरून विविध वस्तू बोलविण्याचे 'फॅड' हरिसालच्या अनेकांमध्ये दिसतो.
ई-पेमेंटची सुविधा नाही -
गावातील दुकानात किंवा हॉटेलमध्ये ई-पेमेंटची सुविधा नाही. स्वॅप मशीनही नाही. याबाबत येथील रहिवासी म्हणतात, की अशी सुविधा परतवाडा किंवा अमरावतीत पण प्रत्येक दुकानात दिसत नाही. आमच्या गावात याची गरज जरी भासत नसली तरी कोणतीही वस्तू आम्ही ई-बँकिंग सुविधेद्वारे बोलावतो यात विशेष काही बाऊ करण्यासारखे नाही, असेही येथील युवकांनी सांगितले. येथील शासकीय रुग्णालयात टेली मेडिसिन ही सुविधा आहे. या सुविधेच्या माध्यमातून एखाद्या रुग्णाच्या उपचाराकरिता येथील डॉक्टरांना अमरावतीच्या डॉक्टरांचा सल्ल घेता येतो. या सुविधेमुळे ३४८ रुग्णांवर उपचार करण्यास मदत झाली आहे.
हरिसाल डिजिटल झाले म्हणजे मोठा चमत्कार वगैरे झाला असे जरी नसले तरी हरिसालला आधुनिकतेची चाहूल लागली आहे, हे ग्रामस्थांचे मत आहे. हरिसालवरुन सध्या होत असलेल्या चर्चांतून हरिसालची बदनामी न होता विकास साधला जावा, असे मत हरिसालवासियांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले.