अमरावती : पूर्वी शहरात मोठ्या प्रमाणात दिसणाऱ्या चिमण्या सध्या दिसेनाशा झाल्या आहेत. अमरावती शहरालगत असणाऱ्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील तलाव परिसरात रविवारी मराठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून शाळकरी विद्यार्थ्यांनी चिमण्यांसह विविध पक्षांचे सर्वेक्षण केले. आज जागतिक चिमणी दिनाच्या पर्वावर छत्री तलाव परिसरात या चिमुकल्यांची चिवचिव सकाळपासूनच सुरू झाली. तलाव परिसरातील या सर्वेक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या पक्षांचे दर्शन घडले. बगळ्यांसह रंगीबेरंगी पक्षी मोठ्या प्रमाणात तलाव परिसरात आढळून आले. काही ठिकाणी झाडांवर चिमण्यांची घरटी दिसली. चिऊताईचे घर पाहताना चिमुकल्यांना अतिशय आनंद झाला. या मोहिमेमध्ये राज्यभरातील चिमुकले सहभागी झाले आहेत.
चिमण्यांच्या संख्येत घट : तलाव परिसरात चिमण्यांपेक्षा इतर पक्षीच मोठ्या प्रमाणात आढळून आलेत. मानवी वस्तीतून कमी झालेल्या चिमण्या जंगलात देखील हव्या तशा आढळत नाही, असे या सर्वेक्षणा दरम्यान आढळून आले. या चिमण्यांची संख्या शहरी भागात विविध ठिकाणी लागलेल्या मोबाईल टावरमुळे कमी झाली आहे. चिमण्यांची संख्या कमी होणे हे पर्यावरण दृष्ट्या योग्य नाही. आपल्या भोवतालच्या परिसरात चिमण्या वाढाव्या यासाठी समाजातील सर्वच घटकांनी जागृत व्हायला हवे असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे अमरावती विभाग अध्यक्ष प्रवीण गुल्हाने यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना केले.
ऑनलाइन सर्वे करण्याचे आवाहन : शहरालगतच्या तलाव परिसरात दोन दिवसांपासून चिमण्यांसह विविध पक्षांचे निरीक्षण केले जात आहे. यावेळी मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने विद्यार्थ्यांना आपल्या घराच्या अंगणात परिसरात दिवसभरात किती चिमण्या आढळतात. सकाळी किती चिमण्या अंगणात, घरात आल्या तसेच सायंकाळी देखील घराच्या परिसरात किती चिमण्या दिसल्या याबाबतची संपूर्ण नोंद विद्यार्थ्यांनी ऑनलाइन करावी. यासाठी एक खास लिंक देखील शहरातील अनेक शाळेतील विद्यार्थ्यांना मोबाईल फोनवर पाठवण्यात आली आहे.
घरटे निर्मितीचे प्रशिक्षण : चिमण्यांसाठी आपण स्वतः घरटे तयार करून ते आपल्या घरावर किंवा घराच्या परिसरात ठेवावे, असे आवाहन करीत मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने विद्यार्थ्यांना आज घरटे तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या घरासह शाळेत देखील असे घरटे ठेवावे. या घरट्यांजवळ चिमण्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था देखील करावी. आता उन्हाळ्यात चिमण्यांसह सर्वच पक्षांना पाणी पिता यावे याची व्यवस्था देखील विद्यार्थ्यांसह प्रत्येकाने करावी असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे अमरावती विभाग अध्यक्ष प्रवीण गुल्हाने यांनी केले. आज संपूर्ण राज्यात केल्या सर्वेक्षणातील चिमण्यांची माहिती एकाच ठिकाणी संकलित केली जाणार असल्याची माहिती देखील प्रवीण गुल्हाने यांनी दिली.