अमरावती : मे महिन्यातील उन्हाचे चटके कमी होऊन जून महिन्यात पावसाची प्रतीक्षा लागली असतानाच निसर्गातील जांभूळ हे सर्वांना आवडणारा रानमेवा बाजारात विकायला येतात. अमरावती जिल्ह्यात सातपुडा रांगेत मेळघाटच्या जंगलात मोठे जांभूळ वन आहे. या जंगलातील जांभूळ तोडून त्याची विक्री करणाऱ्या आदिवासी बांधवांना सध्या चांगला रोजगार उपलब्ध झाला असून दिवसाला तीन हजार रुपयांपर्यंतची मिळकत जांभूळ विक्रीतून होत असल्याची माहिती सुनील कासदेकर या आदिवासी तरुणाने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
जांभूळ तोडण्यासाठी 40 किलोमीटर पायपीट : मेळघाटात उपलब्ध होणाऱ्या विविध रानमेव्यापैकी जांभूळ हा अतिशय महत्त्वाचा राणमेवा आहे. हे जांभूळ तोडण्यासाठी चिखलदरासह लगतच्या काही गावांमध्ये दहा-पंधरा कुटुंब हे 35 ते 40 किलोमीटर पर्यंत जंगलात पायपीट करतात. जंगलात असणाऱ्या 40 ते 80 फूट वाढलेल्या जांभळाच्या झाडाची जांभूळ तोडणे झाडाखालची जांभूळ वेचणे आणि मोठ्या टोपल्यामध्ये भरून जंगलातून पुन्हा पहाड उतरून तर कधी पहाड चढून पायवाटेद्वारे चिखलदरा येथे पोहोचण्याचा नित्यक्रम सध्या अनेक आदिवासी कुटुंब करीत आहेत.
जांभूळ विकून मिळतात तीन हजार रु: पहाटे पाच वाजल्यापासून जांभूळ तोडण्यासाठी घराबाहेर पडल्यावर जंगलातून चिखलदरा येथे दुपारी बारा वाजायच्या आत येण्याची भली मोठी कसरत या आदिवासी कुटुंबांना करावी लागते. चिखलदरा येथे येणारे पर्यटक यासह स्थानिक सदन रहिवासी शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून या जांभूळचे खरेदी होत आहे. सध्या दिवसाला टोपलीतले सर्व जांभूळ विकून हातात तीन हजार रुपयांपर्यंत पैसे येत आहेत. कधी दोन हजार रुपयांपर्यंत व्यवसाय होतो, तर एखाद वेळी दोन-तीनशे रुपयांवरच समाधान मानावे लागते असे सुनील कासदेकर म्हणाले. चिखलदऱ्यांसह सेमाडोह, हरीसाल आणि धारणी परिसरात देखील अनेक आदिवासी बांधवांना सध्या महिनाभर तरी जांभूळ तोडून विक्री द्वारे रोजगार मिळतो आहे.
जांभूळ खाण्याचे असे आहे महत्त्व : जांभूळामध्ये लोह, कॅल्शियम, प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात. गोड आंबट आणि तुरट चव असणारे हे जांभूळ अतिशय पोषक आहेत. ज्या व्यक्तींना प्रवासादरम्यान उलट्यांचा त्रास होतो त्यांना जांभळाची पाने खाल्ली तर त्यांचा हा त्रास नाहीसा होतो. जांभळाच्या पानांचा रस आणि सालीपासून केलेला काढा घेतल्यास अतिसार नाहीसा होतो. जांभूळ हे पाचक फळ असून शौच साफ होत नसल्यास जांभळीची साल खाणे गुणकारी आहे. जांभूळ फळापासून जेली असो सिरप असे उपयुक्त पदार्थ तयार केल्या जाते. चेहऱ्यावरील मुरमाच्या फुटकळ्या जांभळाच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ रक्त शुद्ध करतो. जांभळाची अंतर साल दंतमंजन करिता वापरल्यास दात हलणे दातातून रक्त येणे दात किडणे या तक्रारीवर मात करता येते. शिवाय यामुळे दात मजबूत देखील होतात.
पक्षी,कीटक प्राण्यांनाही आवडतं जांभूळ : जांभूळ हे जंबू जामुन, जाम, जांभु, जांबोली, जामून या नावाने देखील ओळखले जाते. गोड आंबट तुरट चवीचे जांभूळ वृक्षाच्या पानावर रेशमाची किडे उत्तमरीत्या पोसले जातात. माकड ,वटवाघुळ फलाहारी पक्षी यांचे जांभूळ हे आवडते वृक्ष आहे. फुलांचे परागीकरण बियांचे विखुरणे पुनरजीवन या गोष्टी जांभूळ वृक्षामुळे होतात. मसण्या उद कोल्हा घोडे यांचे जांभूळ हे आवडते फळ आहे. या झाडाचा फुलोरा मधमाशा, फुलपाखरे, पतंग, मोठ्या निळ्यामाशा यांना आकर्षित करणारे आहे.
हेही वाचा - Food For Healthy Teeth : दात निरोगी ठेवायचे आहेत? या पदार्थांचा आहारात समावेश करा