अमरावती Ekal Vidyalaya Abhiyan : चिखलदरा आणि धारणी या दोन तालुक्यांमध्ये 23 वर्षांपासून मेळघाटात (Melghat News) एकल विद्यालय अभियान उपक्रम सुरू आहे. सध्या या सर्व एकल विद्यालयांमध्ये 6 हजार 707 आदिवासी विद्यार्थी आपल्या शाळेच्या अभ्यासासह भारतीय संस्कृतीचे धडे (Indian Culture) घेत आहेत.
गावात झाडाखाली भरते शाळा : मेळघाटात आदिवासी चिमुकली सायंकाळी गावातील एखाद्या मोठ्या झाडाखाली एकत्रित येतात. त्या ठिकाणी त्यांना महिला शिक्षिका प्रेरणादायी गोष्टी सांगतात, गाणे म्हणायला लावतात. अनेकदा नाचत गात संस्कृतीपर माहिती देखील देतात. या सोबतच चिमुकल्यांनी आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सकाळी जो काही अभ्यास केला त्या अभ्यासाची उजळणी देखील करून घेतली जाते.
'या' विद्यार्थ्यांना एकल शाळेत मिळतो प्रवेश : भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मातील चालीरीतींची माहिती देखील शिक्षक विद्यार्थ्यांना देतात. राष्ट्रभक्तीपर गाणी एकल विद्यालयात गायली जातात. गणितासारखा किचकट विषय अगदी हसत खेळत आणि गाणी म्हणत अनेक गावातील शिक्षक अगदी आनंदात शिकवतात. सहा वर्षावरील विद्यार्थ्यांना एकल शाळेत प्रवेश मिळतो. मेळघाटसारख्या आदिवासी भागात गरीब विद्यार्थी (Adivasi Students in Melghat) कोठे शिकवणी लावू शकत नाहीत. या एकल विद्यालयाच्या माध्यमातून सायंकाळी दोन तास चालणाऱ्या वर्गाद्वारे त्यांचा शाळेतील अभ्यास देखील चांगल्या प्रकारे घेतला जातो, अशी माहिती गांगरखेड गावातील मंगल धुर्वे या संघ समितीच्या अध्यक्षांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
शिक्षक या पाच विषयांकडे देतात लक्ष : आपल्या गावातील चिमुकल्यांना संस्कृती धर्म शिकवण्यासोबतच मोठ्यांचा आदर राखणं, त्यांच्यासोबत कसं बोलणं यासंदर्भात विनम्रतेचे धडे देखील दिले जातात. धार्मिक आणि सामाजिक जागृती, आरोग्य संदर्भात जनजागृती, ग्राम विकासाचं महत्त्व, प्राथमिक शिक्षण अशा महत्त्वाच्या विषयांवर देखील चिमुकल्यांना संस्काराचे धडे देणारे शिक्षक मेळघाटात 'एकल विद्यालय' अभियानांतर्गत काम करतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मेळघाटातील शेतकऱ्यांना जैविक शेतीसाठी प्रेरित करून त्यांना कीटकनाशक तयार करणे, शेतात रसायनांचा वापर कमी करणे याबाबत मार्गदर्शन केलं जातं, असं बबली बैठेकर यांनी सांगितलं.
एकल विद्यालय अभियानाची अशी झाली सुरुवात : भारतातील ग्रामीण आणि आदिवासी भागांत लोकांमध्ये साक्षरतेचं प्रमाण वाढावं या उद्देशानं कुठलाही नफा तोटा न पाहता एकल विद्यालय अभियान राबविलं जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी संघ संचालक भाऊराव देवरस यांचे धाकटे भाऊ मधुकर देवरस यांनी एकल विद्यालयाची संकल्पना मांडली. या संकल्पने अंतर्गत देशातील ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळ राबवणं हा मुख्य उद्देश होता. 1986 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी श्याम गुप्ता यांच्या माध्यमातून ही चळवळ पुढे देशभरात मोठी झाली, अशी माहिती एकल विद्यालय अभियानाचे परतवाडा विभाग प्रमुख सूरज राठोड यांनी दिली. आज एकल विद्यालय अभियानांतर्गत मेळघाटात आदिवासी बालकांमध्ये आणि एकूणच आदिवासी संस्कृतीमध्ये बराच बदल जाणवताना दिसतो आहे, असं देखील सूरज राठोड यांनी म्हटलं आहे.
मेळघाटात एकल विद्यालयाचे असे चालते काम : मेळघाटातील जंगल परिसरात वसलेल्या गावांमध्ये प्रत्येक एकल विद्यालयात एक शिक्षक आहेत. हे शिक्षक प्रामुख्याने ज्या गावात एकल विद्यालय आहे, त्याच गावातील मूळ रहिवासी आहेत. या शिक्षकांना वेळोवेळी प्रशिक्षण दिलं जातं. मेघाटातील एकूण 30 गावातील शाळांवर एक संच प्रमुख नेमण्यात आला आहे. हा संच प्रमुख महिन्यातून 25 दिवस सतत मेळघाटात प्रवास करून प्रत्येक शाळेला भेट देऊन शाळेत सुरू असलेल्या कामाची पाहणी करतो. या संचप्रमुखावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाच कार्यकर्त्यांची एक समिती कार्यरत आहे. हे एकल विद्यालय चालवण्यासाठी लागणारा खर्च हा वनबंधू परिषदेच्या वतीनं समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून देणगी स्वरुपात आलेल्या निधीद्वारे केला जातो. शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाला केवळ एक हजार रुपये मानधन मिळतं. या मानधनातून संबंधित शिक्षक आपल्या गावात सुसंस्कृत नवी पिढी घडविण्यावर भर देतात.
देणगीदार शाळांची करतात पाहणी : मेळघाटात चालणाऱ्या एकल विद्यालयांसाठी वनबंधू परिषदेच्या वतीनं अनेक देणगीदार पैसे देतात. काही देणगीदारांनी कुठे वैयक्तिक स्वरूपात काही शाळा दत्तक घेतल्या आहेत, तर कुठे पाच ते दहा जणांनी एकत्रित येऊन काही शाळांची जबाबदारी स्वीकारली आहे. एकल विद्यालय सुरळीत चालावी यासाठी देणगीदार जी काही देणगी देतात त्यातून नेमके कसे काम सुरू आहे, याची पाहणी करण्यासाठी मेळघाटात अधून मधून भेट देखील देतात.
हेही वाचा -
Dolar Festival : पोळ्याच्या करीला आनंदाचा 'डोलार'; मेळघाटात आगळावेगळा आनंदोत्सव