अमरावती - शासनाकडून विविध योजना आणि कोट्यवधी रुपये खर्चून सातपुडा पर्वत रांगेत ( Satpuda Mountain Range ) वसलेल्या मेळघाटात ( Melghat ) आदिवासींच्या मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी गत अनेक वर्षांपासून प्रयत्न केले जात आहे. हे प्रयत्न अद्यापही फारसे यशस्वी होताना दिसत नसले तरी मेळघाटातील घटांग ह्या गावात मात्र शैक्षणिक नवोदय झाल्याचे पाहायला मिळत आहे. अवघे 43 घर असणाऱ्या या आदिवासी गावात 13 घरांमधील एकूण 14 चिमुकले हे आता नवोदय विद्यालयात ( Navodaya School ) शिकत आहेत. विशेष म्हणजे आता गावातील सर्वच अशिक्षित पालक हे आपला मुलगा नवोदयला शिकायला गेले पाहिजे असे स्वप्न रंगवत आहेत. संपूर्ण गावात अशी शैक्षणिक जागृती झाल्यामुळे या गावाने आपली आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे. वैजनाथ इप्पर यांच्यासह घटांग येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत तोटे हे देखील आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विशेष असे मार्गदर्शन करीत आहेत.
वैजनाथ पॅटर्नमुळे शैक्षणिक जागृती - शिकून मोठे व्हावे याहीपेक्षा शिक्षण म्हणजे काय हा विचार देखील मेळघाटातील अनेक गावात रुजला नसतांना मेघाच्या पायथ्याशी वसलेल्या सातपुडा पर्वत रांगेतील घटांग ह्या गावातील एकूण 13 विद्यार्थी आज नवोदय विद्यालयात शिक्षण घेत आहेत. खरंतर ही आदिवासी भागात झालेली मोठी शैक्षणिक क्रांतीच आहे. वैजनाथ पॅटर्न मुळेच घटांमध्ये शैक्षणिक जागृती ( Educational awareness ) झाली असल्याचे बोलले जात आहे. मेघाटात 18 वर्षांपासून शिक्षक म्हणून सेवा देणारे वैजनाथ इप्पर हे प्राथमिक शाळेचे शिक्षक 2017 ला घटांग येथील जिल्हा परिषद शाळेत रुजू झाले. आपण ज्या विद्यार्थ्यांना शिकवतो त्यांच्यात खऱ्या अर्थाने शिक्षणाबाबत आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या पालकांनाही शिक्षणाचे महत्त्व कळावे यासाठी वैजनाथ इप्पर यांनी पहिल्या दिवसापासूनच योग्य नियोजन आखून आपल्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा दिली. आणि आपल्या खास पॅटर्न प्रमाणे विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देण्यासोबतच आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना नवोदयाच्या शिक्षणाची दिशा दिली.
मराठी संवादातून घडला शैक्षणिक विकास - अमरावती जिल्ह्यातील मेळघाट ( Melghat in Amravati district ) हा सातपुडा पर्वतरांगेत वसलेला संपूर्ण आदिवासी भाग ( Tribal Area) आहे. या ठिकाणी कोरकू हीच भाषा ( Korku language ) बोलली जाते. हिंदी भाषा देखील या भागातील आदिवासी बांधव तोडकीमोडकी बोलतात. असे असताना मेळघाटातील विद्यार्थ्यांना मराठी माध्यमांची पुस्तक दिली जातात. मात्र शिक्षकांना या चिमुकल्याण सोबत मराठी भाषा देखील हिंदीतूनच शिकवावी लागते. आदिवासी चिमुकल्यांना त्यांच्या मातृभाषेव्यतिरिक्त हिंदी भाषा कशीबशी कळत असताना मराठी मात्र मुळीच जमत नाही. अशा परिस्थितीत वैजनाथ इप्पर यांनी घाटांग येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिल्या दिवशी पासूनच विद्यार्थ्यांशी केवळ आणि केवळ मराठीतूनच संवाद साधला. इयत्ता पहिली पासून पाचवीच्या विद्यार्थ्यांची सदैव मराठीतच बोलणे सुरू केल्यामुळे विद्यार्थ्यांना देखील हळूहळू मराठी भाषा कळायला लागली आणि मराठी भाषेची आवड निर्माण झाल्यावर शाळेतील प्रत्येक विद्यार्थी मराठी बोलायला लागला. संपूर्ण शिक्षण हे मराठी भाषेत असल्यामुळे मराठी भाषा येणे ही या भागातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे त्यांची मराठी भाषा पक्की करणे हेच त्यांना योग्य शिक्षण देण्यासाठी आवश्यक असल्यामुळे मी मराठी भाषेवरच भर दिला असे वैजनाथ इप्पर 'ईटीव्ही भारत ' शी बोलताना म्हणाले.
घटांमध्येही मुलींचीच भरारी - आज नवोदयचे गाव ( Navodaya Village ) अशी ओळख निर्माण करणाऱ्या घटांगमध्ये देखील मुलांच्या तुलनेत मुली अधिक हुशार असल्याचे पाहायला मिळत आहे. गावातील एकूण 14 विद्यार्थी नवोदयला शिकत असताना यामध्ये 3 मुले तर 11 मुलींचा समावेश आहे. या शाळेत 2017-18 या शैक्षणिक वर्षात उज्वला प्रकाश नागले, सुहानी प्यारेलाल नागले आणि महिमा सहदेव बेलकर या तीन मुली पहिल्यांदाच नवोदयची परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या. 2018-19 मध्ये सुरज प्रकाश नागले आणि डॉली कैलाश सुरजे हे दोघे नवोदयची परीक्षा उत्तीर्ण झालेत. 2019-20 मध्ये घेण्यात आलेल्या नवोदयच्या परीक्षेत घटांग येथील जिल्हा परिषद शाळेतील ओम गजानन गायन, हेमा श्रावण येवले, प्रेरणा महादेव बेलकर आणि कृतिका नामदेव बेलकर हे चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. 2020-21 मध्ये वैष्णवी श्रावण येवले, सुश्मिता गणेश बेलकर, कार्तिक शिवचरण बडोदे आणि आदर्श कृष्णा आठवले हे चार जण उत्तीर्ण झाले. तसेच 2021- 22 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत पियुष अशोक नागले आणि खुशी रमेश येवलेयाविद्यार्थ्यांनी नवोदयचा परीक्षेत बाजी मारली. यावर्षी देखील या शाळेतील एकूण आठ विद्यार्थ्यांकडून नवोदयच्या परीक्षेसाठी तयारी करून घेतली जात आहे. यापैकी हुशार असणाऱ्या चार विद्यार्थ्यांवर विशेष अशी मेहनत घेतली जात आहे. नवोदयच्या परीक्षेसोबतच इतर परीक्षांवर देखील शिक्षक वैजनाथ इप्पर आणि मुख्याध्यापक श्रीकांत तोटे भर देत आहेत.
शिक्षणासाठी ग्रामस्थांचा पुढाकार - आपल्या गावातील एकूण 14 विद्यार्थी आता नवोदय मध्ये शिक्षण घेत असल्यामुळे घटांग येतील आदिवासी ग्रामस्थांना याचा अभिमान वाटायला लागला आहे. विशेष म्हणजे गावातील प्रत्येक मुलगा चांगला शिकावा यासाठी मोलमजुरी करणाऱ्या गावातील आदिवासी बांधवांनी लोक सहभागातून दोन वर्षात एक लाख रुपये गोळा केले आहेत. ही सर्व रक्कम विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणाऱ्या विविध विषयांच्या पुस्तकांसाठी खर्च केली जात आहे .घटांग या गावाचे सरपंच दीपेश बेलकर आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास येवले यांच्या वतीने देखील शाळेसह संपूर्ण गावात शैक्षणिक वातावरण बळकट होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली जात आहे.