अमरावती - जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील शासकीय वसतीगृहात कोविड सेंटर आहे. या क्वारंटाइन सेंटरवर पॉझिटिव्ह असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास ठेवण्यात आले होते. मंगळवारी रात्री त्याने गोंधळ घालून जबरदस्तीने घरी गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या कर्मचाऱ्याने दारू प्राशन केल्याची माहिती समोर आली आहे.
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत एक ३० वर्षीय पुरूष पोलीस कर्मचारी शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह झाला. यामुळे येथील 2 पोलीस, 4 होमगार्ड व १ खासगी व्यक्ती अशा ७ जणांना स्थानिक कोविड सेंटरवर क्वारंटाइन करण्यात आले होते. यांचा थ्रोट स्वॅब घेतला असून अहवाल येणे बाकी आहे. अहवाल येईपर्यंत कोविड सेंटरवर क्वारंटाइन करण्यात येते. परंतु चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनचा बक्कल नंबर २०९० असलेल्या ३५ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याने दारू सेवन करून क्वारंटाइन सेंटरवर गोंधळ घातला व "मला घरी जाऊ दिले नाही तर मी पळून जाईल" असे क्वारंटाइन सेंटरवर असलेल्या कर्मचाऱ्यांना सांगितले. यानंतर कर्मचाऱ्याकडून लेखी लिहून घेतले व घरी जाण्यास सोडले. परंतु लहान-लहान गोष्टीवर तक्रार दाखल करणाऱ्या आरोग्य खात्याने या गंभीर गोष्टीकडे दुर्लक्ष का केलेस असा सवाल निर्माण झाला असून क्वारंटाइन असताना कोविड सेंटरवर दारू कुठून आली याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.
ठाणेदारांनी बुधवारी कोविड सेंटरला भेट देऊन याबाबतची सविस्तर माहिती घेतली. घडलेली घटना ही पोलीस खात्याला न शोभणारी आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्याचा कसूरी अहवाल ग्रामीण पोलीस अधिक्षकांना पाठविणार असल्याचे चांदूर रेल्वेचे ठाणेदार दीपक वानखडे यांनी सांगितले.