मेळघाट (अमरावती) - कोरोनामुळे गेल्या पंधरा महिन्यापासून अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील वाइल्डलाइफ जंगल सफारी पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे ही जंगल सफारी सुरू करण्याची मागणी मेळघाट जिप्सी चालक-मालक संघटनेने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य वनरक्षकांकडे केली आहे. मेळघाटातील लोकांचा रोजगार हा पर्यटकावर अवलंबून आहे. मात्र गेल्या अनेक दिवसापासून कोरोना प्रादुर्भावामुळे येथील जंगल सफारी बंद आहे. त्यामुळे जंगल सफारी पुन्हा चालू करून आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्यावा, अन्यथा आम्हाला शासनाकडून मदत द्यावे, अशी मागणी जिप्सी चालक मालक संघटनेने केली आहे.
'सफारी सुरू करा'
विदर्भाचा काश्मीर म्हणून ओळख असलेल्या चिखलदरामध्ये मोठ्या प्रमाणावर येणारे पर्यटक जंगल सफारीचा आनंद घेतात. या जंगल सफारीच्या माध्यमातून येथील अनेक जिप्सी चालक, मालक व गाइड्स यांना मोठा रोजगार प्राप्त होतो. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक महिन्यांपासून ही जंगल सफारी बंद असल्यामुळे येथील जिप्सी चालक-मालक व गाइड या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. चिखलदऱ्यातील पर्यटन सुरू झाले आहे. त्यामुळे आता मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी सुरू करावी, अशी मागणी या जिप्सी चालक-मालक संघटनांनी केली आहे.