अमरावती - उपमुख्यमंत्री अजित पवार आज (मंगळवारी) अमरावती विभागाच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी शहरात आले. आमदार सुलभा खोडके यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ त्यांचे स्वागत केले. यावेळी नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात मुस्लीम बांधवांनी त्यांना निवेदन दिले. यावर या कायद्याबाबत महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी शंका-कुशंका न बाळगता निश्चिंत राहावे, अशी शाश्वती उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.
शासकीय विश्रामगृह येथून अजित पवार यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आला. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी शेकडो नागरिक जमले होते. अजित पवार यांनी भर गर्दीत गाडी खाली उतरून उपस्थितांना अभिवादन केले. यावेळी आमदार सुलभा खोडके यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 13 जानेवारीपासून शहरातील इर्विन चौकात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात ठिय्या देऊन बसलेल्या मुस्लीम समुदायाच्यावतीने अजित पवार यांना यावेळी निवेदन सादर करण्यात आले.
हेही वाचा - शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार; गिरीश महाजनांचा सरकारला इशारा
नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात एक मताने निर्णय होऊन राज्यातील कुठल्याही व्यक्तीला कोणतीही अडचण येणार नाही, याबाबत निर्णय झाला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व नागरिकांनी निश्चिंत राहावे, असे अजित पवार यावेळी म्हणाले. राज्याच्या भूमिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयालाही कळविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.