अमरावती- उत्तर प्रदेशातील हातरस येथे युवतीवर झालेल्या अत्याचारविरोधात शहरातील काँग्रेस पक्षातर्फे आज निषेध नोदवण्यात आला. सायंकाळी इर्विन चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर या अत्याचाराचा विरोध करण्यात आला असून राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी, स्वतःला देशाचा चौकीदार म्हणवणारा खरच देशातील महिलांचे रक्षण करतो का? असा प्रश्न उपस्थित केला.
देशात सध्या गुंडशाही आणि दडपशाही सुरू आहे. उत्तरप्रदेशमध्ये जे काही घडले ते अतिशय वेदनादायी आहे. खरतर हे सर्व बोलायला शब्द कमी पडतात. एका युवतीवर बलात्कार होतो. तिची जीभ कापली जाते. एक आठवडाभर तिला तडपू दिले जाते आणि तिचा मृत्यू झाल्यावर पोलीस तिला जाळून टाकतात. हे देशात काय सुरू आहे? असा प्रश्न सर्वांना पडत आहे. आपला देश लोकशाहीचा देश आहे. आणि देशात आज लोकशाही विरोधी कार्य सुरू आहे. आमचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला गेले होते. त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. हे सगळे संविधानाच्या विपरित चालले असल्याचे यशोमती ठाकूर म्हणाल्या.
यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यानी मेणबत्त्या पेटवून पीडितेला श्रद्धांजली वाहिली. उत्तरप्रदेशातील योगी सरकार आणि देशातील मोदी सरकार विरोधात घोषणाही देण्यात आल्या. यशोमती ठाकूर यामच्यासह अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके, दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहर अध्यक्ष किशोर बोरकर, माजी आमदार वीरेंद्र जगताप महापालिकेचे विरोधी पक्ष नेते बबलू देशमुख, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निलेश गुहे, एनएसयूआयचे संकेत केलट, सिद्धार्थ बोबडे, आदी उपस्थित होते.
हेही वाचा- अमरावतीच्या येवदा गावातील शेतकऱ्यांची बचत खाते अचानक बंद; शेतकरी आक्रमक