अमरावती Diwali 2023 Amravati : समाजाची सेवा करण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहे. पण त्यातही अन्नदान अधिक श्रेष्ठ आहे. म्हणतात ना की, माणूस भरल्या पोटी विचार करतो अन् उपाशी पोटी भांडण करतो. ज्यांना खऱ्या अर्थानं गरज आहे, अशा गरजूंपर्यंत आपली सेवा पोहोचली तरंच त्या सेवेचं फलित असते. अमरावतीत अशीच एक सेवा विठ्ठल सोनवळकरांनी सुरू केली. ती म्हणजे अन्नदान करण्याची सेवा! अंध, अनाथ आणि दिव्यांगांना आपल्या पोळी भाजी केंद्रातून मोफत भोजन देण्याचा उपक्रम सोनवळकर हे गेल्या 34 वर्षांपासून राबवित आहेत.
दोन दिवस पुरणपोळीचं वाटप : सणांचा राजा म्हणून दिवाळी या सणाची ओळख आहे. भारतीय संस्कतीमध्ये या सणाला विशेष महत्त्व आहे. बेघर, अनाथ लोकांना दिवाळीच्या दिवशी गोड धोड खायला मिळावं, तसंच त्यांचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी सोनवळकर हे पुरणपोळीचे वाटप करतात. गेल्या 34 वर्षांपासून राष्ट्रीय तसंच भारतीय संस्कृतीतील मोठ्या सणांना शहरातील दीन-दुबळ्यांना मोफत मिष्टान्नाचं भोजन देण्याचा सोनवळकरांचा उपक्रम सुरू आहे. यावर्षीदेखील 10 अन् 11 नोव्हेंबरला दिवाळीनिमित्त भाजी पोळी केंद्रात ते पुरणपोळीचे मोफत वाटप करणार आहेत.
- 34 वर्षांपासून अविरत सेवा : विठ्ठल सोनवळकर हे एका हातगाडीवर गॅस वेल्डिंगचा व्यवसाय करतात. शहरातील कॉटन मार्केटलगत वालकट कंपाउंड परिसरात मागील 40 वर्षांपासून ते हा व्यवसाय करतात. या एवढ्याशा व्यवसायाच्या भरवशावर ते रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना पाच रुपयांत तीन पोळ्या अन् वाटीभर डाळभाजी मोफत देतात.
'रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा' : विठ्ठल सोनवळकर हे परभणी जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून अमरावती येथे स्थायिक झाले. 26 जानेवारी 1989 रोजी त्यांनी भाजीपोळी केंद्राची स्थापना केली. शहरातील अंध, अपंग तसंच रुग्णालयात येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अत्यल्प दरात जेवण मिळावं या उद्देशानं त्यांनी सुरू केलेल्या या केंद्रात सेवेचा अखंड झरा वाहतोय. त्यांनी मागील 34 वर्षांत या सेवेत कधीच कोणताही खंड पडू दिला नाही. या सेवेबरोबरच शहरातील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना पाच रुपयांत तीन पोळ्या आणि वाटीभर डाळभाजी हा त्यांचा उपक्रमही सुरू आहे. रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे, यापेक्षा कुठलीही सेवा उत्तम असू शकत नाही, असं त्यांचं मत आहे.
हेही वाचा -
- Matoshree Vrudhashram Amravati : दिवाळीला कुणीतरी भेटायला या! मुलांनी वृद्धाश्रमात सोडलेल्या माता-पित्यांच्या डोळ्यात अश्रू
- Dasara Special Story : दसरा महोत्सवाच्या चित्त थरारक कवायतींसाठी शेकडो विद्यार्थ्यांचा सराव; 93 वर्षांपासूनची परंपरा कायम
- Bus Fare Hike : ऐन दिवाळीत प्रवाशांचं निघालं दिवाळं; खासगी बसची तिप्पट भाडे वाढ