अमरावती - शहरात कोरोना संकटाच्या काळात लॉकडाऊनमध्ये गरीब व गरजूंना अन्नदान करण्याचे काम 'नानक रोटी' उपक्रमद्वारे करण्यात येत आहे. त्यामुळे या 'नानक रोटी' उपक्रमाला भेट देऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
कोरोना प्रादुर्भावामुळे देशात आणि राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू आहे. त्यामुळे अनेक नागरिक जिल्ह्यात अडकून पडले आहेत. त्याचप्रमाणे, अनेक लोकांचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या काळात 'नानक रोटी' उपक्रमाकडून गरजूंना मोठी मदत होत आहे. हातावर पोट असणाऱ्या गोरगरीबांना अन्न पोहचविण्याचे काम 'नानक रोटी' उपक्रमाद्वारे सुरु आहे. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी नवाल यांनी शुक्रवारी या उपक्रमाला भेट दिली. उपजिल्हाधिकारी अजय लहानेही यावेळी उपस्थित होते.
'नानक रोटी' ट्रस्टद्वारा 2018 पासून लंगर सेवा सुरू आहे. या उपक्रमात संपूर्ण वर्षभर गरजूंना भोजनदान केले जाते. कोणीही भुकेले राहू नये, असा या उपक्रमाचा उद्देश आहे. भाईसाहेब गुरुप्रीत सिंगजी उर्फ रिंकू वीरजी यांच्या प्रेरणेतून अमरावती शहरासह उल्हासनगर, अकोला, वाशिम, बऱ्हाणपूर, सोलापूर, मुर्तिजापूर, कारंजा लाड, अमळनेर, नांदुरा, जळगाव यासह देशात 57 ठिकाणी 'नानक रोटी' ट्रस्ट सेवा देत आहे. कोरोनाच्या संकटकाळातही ट्रस्टतर्फे शहरात सर्वदूर सेवा देण्यात येत असून, शेकडो गरीब व गरजू बांधवांना त्याचा लाभ होत आहे. यावेळी प्रशासनाकडून ट्रस्टला आवश्यक धान्य, साहित्य मिळवून देण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी शंकर ओटवानी, राजकुमार दुर्गई, मोहित भोजवानी, मनोज पुरसवानी, संदीप हासानी, गणेश थावरानी, गुलशन दुर्गई, श्यामलाल पिंजाणी, अजय पिंजाणी, संजय पिंजाणी, इंद्रकुमार लुल्ला, हरीश बजाज, ज्ञानचंद थदानी, रेवाचंद बजाज, मोहनलाल वरंदानी, राहूल दुर्गई, हजारीलाल सेवानी, तरूण दुर्गई, रवी डोलतानी, मोना खत्री, मंदा तायडे आदी उपस्थित होते.