अमरावती - 'चला चिमण्या वाचवू या, त्यांनाही घर देऊ या', असा आगळावेगळा उपक्रम आज वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धन संस्थेने गाडगे महाराज समाधी मंदिर परिसरात राबविला. या उपक्रमांतर्गत नागरिकांना चिमण्यांची कृत्रिम घरटे आणि त्यांना पाणी पिण्यासाठी मातीचे भांडे मोफत वितरित करण्यात आले.
वर्षानुवर्षे मानवीवस्ती भोवताल व माणसांच्या घरात मानवाचा मित्र बनून राहणाऱ्या चिमण्या या गत काही वर्षांपासून कमी होत आहेत. शहरातील वाढती लोकसंख्या, वाहनांचे वाढते प्रदूषण तसेच ग्रामीण भागात शेतात किटकनाशकांच्या फवारणीमुळे चिमण्यांची संख्या कमी होते आहे. घराभोवतली चिमण्यांचा चिवचिवाट जिवंतपणा ठेवतो. हा जिवंतपणा कायम टिकावा यासाठी चिमण्यांचे कृत्रिम घरटे लावण्याचा सल्ला वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था देत आहे. त्यासाठी कृत्रिम घरे प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचावे, यासाठी गाडगे नगर येथे स्टॉल लावण्यात आला आहे.
२० मार्च हा जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो. अमरावती शहरात दरवर्षी २० मार्चला रविवार असला तर किंवा २० मार्चच्या आसपास येणाऱ्या रविवारी हा उपक्रम राबविण्यात येतो, अशी माहिती वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. जयंत वाडतकर यांनी दिली. या स्टॉलवरून आज १ हजाराच्या जवळपास चिमण्यांसाठी कृत्रिम घरटे वितरीत केली जाणार आहेत. संस्थेचे जेष्ठ सदस्य अरविंद कानस्कर यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. गजानन वाघ, सौरभ जवंजाळ, प्रशांत निकम आदी उपस्थित होते.