अमरावती - गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येणारी रस्त्याची मागणी पूर्ण न झाल्याने संतप्त गावकऱ्यांनी चक्क भाजप आमदार रमेश बुंदिले यांची गाडी आडवून त्यांना जाब विचारल्याची घटना घडली आहे. बुंदिले हे अमरावतीच्या दर्यापूर मतदार संघाचे आमदार आहेत.
अमरावतीच्या दर्यापूर मतदार संघातील भामोद-म्हैसपूर या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्याची गेल्या अनेक महिन्यांपासून दुरवस्था झाली आहे. यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासनाला निवेदने दिली. एवढेच नाही, तर भाजप आमदार रमेश बुंदिले यांच्याकडेही अनेकदा या रस्त्याची मागणी केली, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, ही मागणी मंजूर न झाल्याने, अखेर दर्यापूर तालुक्यातील म्हैसपूर गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन गुरुवारी आमदार बुंदिले नांदरन गावला जात असताना त्यांची गाडी अडवली. यावेळी गावकऱ्यांनी भाजप आमदार रमेश बुंदिले यांच्यावर रोष व्यक्त केला.