अमरावती - अंजनगाव बारी गावातील मेटकर कुटुंबाने शेतात पोल्ट्री फार्म उभारून पुरक उद्योगाला सुरुवात केली आहे. यातून त्यांना रोज ८० हजार अंड्याचे उत्पादन मिळते. ही अंडी मध्यप्रदेश विदर्भातल्या इतर भागात पाठवली जातात. गेल्या ३५ वर्षांपूर्वी ५ हजारांचे कर्ज काढून सुरू केलेल्या या पोल्ट्री व्यवसायाची वार्षिक उलाढाल आता ७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
मेटकरांनी शेतीला पूरक उद्योगाची जोड देण्याचा प्रयोग यशस्वी करुन सर्वासमोर एक आदर्श ठेवला आहे. दिलीप आणि रविंद्र मेटकर यांनी आपल्या राहत्या घरी १९८४ मध्ये छोटासा पोल्ट्री फार्म सुरू केला. त्यावेळी त्यांच्याजवळ १०० कोंबड्या होत्या आणि १ एकर शेती होती. आता त्यांच्याजवळ एकूण ३५ एकर शेती आहे. या शेतीत ते सर्वच प्रकारचे उत्पादन घेतात. विशेष म्हणजे ते प्रयोगशील शेतकरी आहेत. लवंग, सुपारी, इलायचीपासून ते नारळ आणि लाल केळीची झाडेसुध्दा त्यांनी लावली आहेत. नवनवीन माहिती घेवून शेती व्यवसाय अधिक समृद्ध कसा करता येईल यावर त्यांचा जोर असतो. जिल्ह्यातल्या फारच कमी शेतकऱ्यांची पऱ्हाटी बोंड अळीच्या हल्ल्यातून बचावली होती. त्यात मेटकर यांच्या पऱ्हाटीचा समावेश होता. त्यांना तब्बल दीडशे क्विंटल कापसाचे उत्पादन मिळाले. फक्त कोंबडीच्या खतावर त्यांनी उत्पादन घेतले होते. त्यांच्या पऱ्हाटीला आदर्श पऱ्हाटी म्हणून लौकिक मिळाला.
शेती करतानाच त्यांनी पोल्ट्री फार्मवर लक्ष केंद्रित केले. त्यांनी पोल्ट्री फार्म काढून त्याला मातोश्री पोल्ट्री फार्म असे नाव दिले. भरपूर मेहनत घेऊन त्यांनी ही पोल्ट्री मोठी केली. चालू स्थितीत त्यांच्याजवळ दीड लाख कोंबड्या आहेत. त्यातील १ लाख कोंबड्या अंडे देणाऱ्या आहेत. या कोंबड्यापासून दररोज ८० हजार अंड्याचे उत्पादन मिळते. दरवर्षी या व्यवसायातून ७ कोटींची उलाढाल होत असून दरवर्षी त्यांना ३० लाखापर्यंत निव्वळ नफा शिल्लक राहतो. त्यांनी १२ शेडमध्ये या कोंबड्यांना ठेवून आधुनिक पद्धतीने त्यांचे संगोपन केले जाते. या कोंबड्यांना दररोज १३ टन खाद्य लागते. ज्याची किंमत २ लाख रुपये आहे. हे खाद्य बाहेरून विकत न घेता त्यांनी खाद्य बनविण्याचे कौशल्य प्राप्त केले आणि आपल्या शेतातच कारखाना सुरू केला. हे खाद्य स्वयंचलित यंत्राच्या माध्यमातून कोंबड्यापर्यंत पोहचवले जाते.
अंजनगांव बारी गावातल्या ४० जणांना या पोल्ट्री फार्ममध्ये रोजगार मिळाला आहे. दररोज उत्पादित होणारी अंडी मध्यप्रदेश इंदोर, खंडवा, भोपाळ, बैतुल, मुलताई आणि विदर्भातल्या परतवाडा, कारंजा येथे पाठवली जातात. खर्च वजा जाता त्यांना चांगला नफा मिळतो. शेती आणि पोल्ट्री फार्म, अशा दोनही आघाड्यावर त्यांचे काम सुरू आहे. ते यशस्वी पोल्ट्री उद्योजक झाल्यामुळे या विषयावर ते अनेक ठिकाणी व्याख्याने देत असतात. त्यांच्या शेतीला आणि फार्मला भेटी देण्यासाठी अनेक येतात त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन जातात. दिलीप मेटकर यांना आजपर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी चर्चेत राहणाऱ्या विदर्भात मेटकर यांची वाटचाल निश्चितच आशेचा किरण दाखवणारी आहे.