अमरावती : विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे विजयी झाले आहेत. सलग दोन वेळा या मतदारसंघात निवडून आलेले डॉ. रणजीत पाटील यांचा धीरज लिंगाडे यांनी 3382 मतांनी पराभव केला. दुसऱ्या पसंती क्रमांकच्या मतमोजणीनंतर धीरज लिंगाडे यांना 46 हजार 344 मते पडली तर डॉ. रणजीत पाटील यांना 42 हजार 962 मते मिळाली. धीरज लंगडे यांच्या विजयाची अधिकृत घोषणा मात्र अद्याप प्रशासनाने केली नाही.
पहिल्या फेरीपासूनच लिंगाडे आघाडीवर : आज सकाळी 8 वाजेपासून अमरावती शहरातील नेमानी गोडाऊन येथे मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली. एकूण एक लाख 2587 मतांपैकी 8735 मतही अवैध निघाली तर 93825 मते ही वैध ठरली. पहिल्या फेरीतच धीरज लिंगाडे यांनी 877 मतांची आघाडी घेतली होती. यानंतर सलग चारही फेरीमध्ये धीरज लिंगाडे यांनी आघाडी घेतली होती. पहिल्या पसंती क्रमाच्या मतमोजणीनंतर धीरज लिंगाडे यांना 43 हजार 340 मते मिळाली तर डॉ. रणजीत पाटील यांना 41 हजार 27 मते मिळाली.
रणजीत पाटालांचा अवैध मतांवर आक्षेप : पहिल्या पसंती क्रमाच्या फेरीत एकूण एक लाख 2587 मतांपैकी आठ हजार 735 मते अवैध ठरली. भाजपचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील या अवैध मतांवर आक्षेप घेतला. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी आणि अमरावती विभागाचे आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी अवैध मतांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. रात्री 1 वाजताच्या सुमारास अवैध मतांची पडताळणी झाल्यावर यामध्ये धीरज लिंगाडे यांना 33 मतांचा फायदा झाला.
दुसऱ्या पसंतीसाठी रात्री दोन वाजता मतमोजणी : पहिल्या पसंती क्रमाच्या मतमोजणीनंतर आणि डॉ. रणजीत पाटील यांनी अवैध मतांवर घेतलेल्या आक्षेपानंतर या अवैध मतांची पडताळणी झाल्यावर 46 हजार 927 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. रात्री 2 वाजतानंतर दुसऱ्या क्रमांकाच्या मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या पसंतीत क्रमात सर्वात कमी बारामती मिळालेल्या निलेश पवार यांना मिळालेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या मतांच्या मोजणी पासून सुरुवात झाली. या बाद फेरीत एकूण 23 उमेदवारांपैकी 21 उमेदवार बाद होईपर्यंत मतमोजणीला प्रारंभ झाला.
रणजीत पाटीलांच्या विरोधात घोषणाबाजी : मतमोजणी दरम्यान अवैध ठरलेल्या 8735 मतांवर आक्षेप घेण्यासाठी डॉ. रणजीत पाटील हे रात्री 11 वाजताच्या सुमारास मतमोजणी केंद्रावर पोहोचले असताना मतमोजणी केंद्राबाहेर हजर असणारे जुन्या पेन्शनची मागणी करणाऱ्या कर्मचारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी डॉ. रणजीत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
महाविकास आघाडीचा जल्लोष : काँग्रेसचे धीरज लिंगाडे हे पहिल्याच फेरीत दोन हजाराच्या वर मतांनी आघाडीवर असल्याचे स्पष्ट होतात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहराच्या विविध भागात जल्लोष केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानक परिसरात असणाऱ्या माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांच्या संपर्क कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष केला. शिवसैनिक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राजकमल चौक येथे देखील जल्लोष केला. मतमोजणी केंद्राबाहेर जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने ढोल ताशे वाजवून जल्लोष करण्यात आला. अमरावती शहरासह अकोला आणि बुलढाणा येथे देखील कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. बुलढाणा येथे धीरज लिंगाडे यांच्या घरासमोर मध्यरात्रीपर्यंत फटाक्यांची आतिषबाजी करून लिंगाळे समर्थकांनी जल्लोष केला.
महाविकास आघाडीचा विजय : विजयी उमेदवार धीरज लिंगाडे म्हणाले की, आज माझा अमरावती पदवीधर मतदारसंघात झालेला विजय हा खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीचा विजय आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे योग्य नियोजन आखून या विजयाचा मार्ग सुकर केला होता. अनेक शिक्षक संघटना आमच्या सोबत होत्या तसेच जुनी पेन्शन योजनेसाठी लढा देणाऱ्या संघटनांनी देखील आम्हाला साथ दिली, असे देखील धीरज लिंगाडे म्हणाले.
बुलढाण्यात जोरदार जल्लोष : अखेर 30 तासांच्या मतमोजणी नंतर धीरज लिंगाडे यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात जोरदार जल्लोष साजरा करण्यात येत आहे. बँड पथकांच्या तालावर गुलाल उधळत हा जल्लोष साजरा करण्यात येत आहे. धीरज लींगाडे यांच्या घरासमोरही जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करून धीरज लिंगाडे यांच्या विजयाचा हा जल्लोष साजरा करण्यात आला.
तीस तास चालली मतमोजणी प्रक्रिया : राज्यातील कोकण नाशिक नागपूर येथील निवडणुकीचे निकाल गुरुवारी सायंकाळी जाहीर झाले असताना अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाची मतमोजणी सलग तीस तासापेक्षा अधिक वेळ चालली.
हेही वाचा : Gautam Adani Family: गौतम अदानी सात भावंडांसोबत राहत होते चाळीत, जाणून घ्या कुटुंबात कोण काय करते?