अमरावती - विदर्भ मेंढपाळ धनगर विकास मंचच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मेंढपाळ धनगर कुटुंबांना प्रत्येकी 100 मेंढ्यांमागे 20 एकर ई-क्लास किंवा एफ-क्लास शासकीय जमीन वृक्ष लागवडीच्या अटीवर मेंढी चराईसाठी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
विदर्भ मेंढपाळ धनगर विकास मंचचे संस्थापक संतोष महात्मे आणि जिल्हाध्यक्ष जानराव कोकरे यांच्या नेतृत्वात इर्विन चौक येथून हा मोर्चा निघाला. जिल्हाधिकारी कार्यालयालगत पोलिसांनी हा मोर्चा रोखला. उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यास पाच प्रतिनिधींना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जाण्याची परवानगी पोलिसांनी दिली. यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होत्या. त्यांनी कार्यालयाबाहेर येऊन धनगर समाज बांधवांचे निवेदन स्वीकारले. यावेळी धगरांची प्रतीक असणारी घोंगडी आणि काठी यशोमती ठाकूर यांना भेट देण्यात आली.
मेंढपाळ धनगरांना 100 मेंढ्यांमागे वृक्षलगवडीच्या अटीवर 20 एकर वनजमीन मेंढीचराईसाठी उपलब्ध करून देण्यात यावी, कोरोनाच्या परिस्थितीत वन विभागाकडून मेंढपाळांना जंगलातून शहराकडे हाकलून देण्याचे कृत्य करणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील कोहोकडी येथील मेंढपाळ कुटुंबावर झालेला हल्ला व राज्यात अनेक ठिकाणी होणाऱ्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मेंढपाळ धनगरांसाठी विशेष सुरक्षा कायदा निर्माण करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशा मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या. या सर्व मागण्यांकडे शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन यशोमती ठाकूर यांनी यावेळी दिले. मोर्चामध्ये मेघशाम करडे, शरद शिंदे, हर्षद शिंदे, तुकाराम यमगर, मंगेश शिंदे, सखाराम गोफने, राम टोळे, गोमा पोकळे आदी सहभाही होते.