अमरावती : वजन कमी करण्याच्या उद्देशाने मी पायी फिरायला सुरुवात केली. मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी मी धावायला सुरुवात केली. अमरावती मॅरेथॉन, मुंबई मॅरेथॉन, पुणे मॅरेथॉन या सर्व ठिकाणी छोटे-मोठे पदक मिळाले आणि त्यानंतर 'कॉम्रेडस् मॅरेथॉन'बाबत ऐकले. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या धावण्याच्या स्पर्धेत आपल्याला सहभागी व्हायचे असे मनाशी पक्क केलं. अमरावतीकरांना धावण्यासाठी प्रेरित करणारे आणि आता आठव्यांदा कॉम्रेडस् मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले दिलीप पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले आणि मी अक्षरशः धावत सुटली असे दीपमाला बद्रे या ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाल्या.
रोज 120 किमीचा सराव: म्हाडामध्ये अभियंता म्हणून कार्यरत असणाऱ्या दीपमाला बद्रे यांनी 'कॉंम्रेडस मॅरेथॉन' सर करण्याचे ठरवले आणि यासाठी चक्क 80 ते 120 किमी धावणे सुरू केले. रात्री 11 ते पहाटे 3 असा धावण्याचा सराव केला. पुढे रात्री 11 ते पहाटे 5 आणि यानंतर सकाळी 7 वाजेपर्यंत त्या अमरावती शहरातील रस्त्यांवर धावायला लागल्या. त्यांच्या या जिद्दीला पती प्रदीप बद्रे यांनी साथ दिली. दिलीप पाटील हेसुद्धा त्यांच्यासोबत रात्री रस्त्यावर धावायला यायचे. त्यांच्या अनुभवामुळेच मी 'कॉंम्रेडस मॅरेथॉन'ची तयारी पूर्ण करू शकले, असे दीपमाला बद्रे म्हणाल्या.
स्थानिकांनी दिले प्रोत्साहन: दक्षिण आफ्रिकेत डरबन ते पीटर मरीडसबर्ग या दोन शहर दरम्यान 90 किलोमीटर अंतराची ही स्पर्धा आहे. आमच्या स्पर्धेला पहाटे पाच वाजता सुरुवात झाली. यावेळी दक्षिण आफ्रिकेतील अनेक लोक हे संपूर्ण 90 किलोमीटर दरम्यान खाण्यापिण्याचे साहित्य घेऊन ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी आले होते. भारतातील 403 स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झालेत. दक्षिण आफ्रिकेतील नागरिकांना भारताप्रति प्रचंड प्रेम असल्याचे यावेळी दिसून आले. धावत असताना 'वेल्डन इंडिया, कमऑन इंडिया' असे म्हणत स्थानिक रहिवासी प्रोत्साहन देत होते.
आणि वेग वाढविला: या स्पर्धेदरम्यान जे सहा टप्पे निश्चित करण्यात आले होते. ते टप्पे ठराविक वेळेस जो स्पर्धक गाठणार नाही त्याला स्पर्धेतून बाद केले जायचे. मी धावत असताना अचानक माझ्या मागून वाहन येताना दिसली. समोर पाहिलं तर माझ्या सातव्या टप्प्यातील अंतर हे अर्धा किलोमीटर लांब असल्याचे लक्षात आले. मी भानावर आले आणि आपण बाद होऊ शकतो हे लक्षात येतात सुसाट धावायला लागली. ठरलेले अंतर मी वेळेत गाठून पुढे धावणे सुरू ठेवले. धावत असताना आजवर केलेली मेहनत मला माझ्या कुटुंबीयांसह ज्यांनी ज्यांनी साथ दिली, मदत केली त्या सगळ्यांच्या आठवणी काही क्षणासाठी जागा झाल्या. आपण स्पर्धा यशस्वी करायची हे मनाशी ठाम करून धावले आणि अकरा तास दहा मिनिटात मी ही स्पर्धा पूर्ण केली असे दीपमाला बद्रे म्हणाल्या.
हेही वाचा: