अमरावती - जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतल्यावर नवनीत राणा यांनी राज्य शासनाने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25 हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी केली.
हेही वाचा - Landslide In Melghat : दरड कोसळल्याने मेळघाटातील तीन गावांचा संपर्क तुटला
खासदार राणा गहिरवल्या
पुसदा, देवरा, देवरी, रोहनखेडा, नांदुरा लष्करपूर, अंतोरा, ब्राह्मणवाडा भगत आदी गावात पुराचे पाणी घुसून प्रचंड नुकसान झाले. शेती पाण्याखाली गेली, घराघरात पाणी शिरले, गुरेढोरे वाहून गेली, ही विदारक दृश्य पाहून खासदार नवनीत राणा गहिवरल्या.
जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश
टेंबा बॅरेज प्रकल्पात समाविष्ट 13 गावे 2007 पासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे. 60 टक्के खरेदी बाकी असल्यामुळे व शासनाच्या लेखी सदर गावे बुडीत क्षेत्रात असल्यामुळे या गावातील नागरिकांना प्रत्येक पावसाळ्यात त्रास सहन करावा लागतो. गावकऱ्यांसमोर खासदार नवनीत राणा यांनी जिल्हाधिकारी पवणीत कौर यांना फोन लावून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. याभागात तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
टेंबा बॅरेज क्षेत्रात विकासाला खीळ
गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हाहाकार माजला आहे. तिवसा मतदारसंघातील टेंबा बॅरेज प्रकल्प ज्याला 2 हजार 700 प्रशासकीय मान्यता असून जमीन 40 टक्के खरेदी झाल्या असून उर्वरित 60 टक्के खरेदी बाकी आहे, त्यामुळे शासन दरबारी हे क्षेत्र बुडीत असून या ठिकाणी विकास कामांना खीळ बसली आहे. दोन हजार गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आपण या प्रकरणात जातीने लक्ष घालून लवकरात लवकर या समस्येचे निराकरण करू, असे अभिवचन नवनीत रवी राणा यांनी गावकऱ्यांना दिले.
ग्रामस्थांनी केल्या तक्रारी
अमरावती जिल्ह्यात पंतप्रधान ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत करण्यात येणारी रस्ते व पुलांच्या कामात तांत्रिक चुका असल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली. त्यावर खासदार नवनीत रवी राणा यांनी तात्काळ या विभागाचे कार्यकारी अभियंता खान यांना भ्रमणध्वनी वरून सर्व कामांची स्थळ पाहणी करून चुका दुरुस्त करण्याचे व अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
पूरग्रस्तांना मदत मिळवून देणार
या गंभीर आपत्तीत आपण गावकऱ्यांच्या पाठीशी असून शासकीय पातळीवर पाठपुरावा करून सर्व आपदाग्रस्तांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी सांगितले.
हेही वाचा - शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे - कृषी मंत्री दादाजी भुसे