अमरावती - शहरातील राजापेठ दस्तुर नगर उड्डाणपुलाचे काम अनेक वर्षापासून रेंगाळले आहे. त्यामुळे आज खासदार नवनीत राणा यांनी या उड्डाण पुलाची पाहणी केली. तसेच 31 डिसेंबर पर्यंत पुलाचे काम पूर्ण करण्याची मुदत अधिकाऱ्यांना दिली. 31 डिसेंबरला जर पुलाचे लोकार्पण झाले नाही, तर संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर तसेच कंत्राटदारांवर कारवाई करण्याचा इशारा देखील खासदार राणा यांनी दिला आहे.
हेही वाचा - दर्यापूरच्या उपविभागीय अधिकारी विरुद्ध युवक काँग्रेस आक्रमक, कारवाईची केली मागणी
राजापेठ येथून बडनेरा आणि दसुर नगरच्या दिशेने उड्डाणपुलाचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. यापैकी बडनेरा मार्गावरील पुलाचे काम पूर्ण झाले असून दस्तुर नगरच्या दिशेने पुलाचे काम रेल्वे क्रॉसिंगमुळे थांबले होते. त्यामुळे नागरिकांना मोठा वळसा घालून यावे लागत होते. त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत खासदार नवनीत राणा यांनी उड्डाणपुलाची पाहणी केली. यावेळी महापालिका आयुक्त संजय निपणे यांच्यासह रेल्वेचे अधिकारी आणि कंत्राटदार उपस्थित होते.