अमरावती - म्हैस चरताना बाजुला असलेल्या नदीत गेली. त्यानंतर तिला नदीतून बाहेर हाकलत असताना एका ७५ वर्षीय वृद्धाचा नदीच्या गाळात फसून मृत्यू झाल्याची घटना जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथे गुरुवारी घडली. शंकर दशरथ वाघाडे (७५) असे त्या वृद्धाचे नाव आहे.
चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील शंकर दशरथ वाघाडे (७५) हे म्हशीला गावालगतच्या चंद्रभागा नदी व खोलाड नदीच्या मधील भागात चरण्यासाठी घेऊन गेले होते. म्हैस चरता चरता नदीत गेली. त्यानंतर म्हशीला परत आणण्यासाठी शंकर वाघाडे सुद्धा नदीत गेले असता ते नदीतील गाळात फसले. नदीमध्ये चांदूर रेल्वे नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे जवान व काही गावकऱ्यांनी होडी घेऊन शोधण्यास सुरूवात केली. २४ तासानंतर गाळात अडकलेला शंकर वाघाडे यांचा मृतदेह आढळून आले.