अमरावती - दोन दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या युवकाचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला आहे. शहरालगतच्या वदड गावाजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महार्गापासून काही अंतरावर हा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. रोहन उर्फ बच्चू चेतन वानखडे (वय 21) असे मृताचे नाव असल्याची माहिती आहे. रविवारी दुपारी राष्ट्रीय महामार्गापासून काही अंतरावर गुरे चारणाऱ्या गुराख्यांना जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. त्यांनी याबाबत बडनेरा पोलिसांना माहिती देताच पोलीस तसेच श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले.
मृतक होता गुन्हेगार
मृत बच्चू वानखडे राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बेलपुरा परिसरातील रहिवासी होता. त्याच्यावर मारामारी, हाफ मर्डर असे विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असुन त्याला तडीपार करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच त्याने आपली तडीपारी रद्द करून आणली होती.
संशयितांचे फोन बंद
बच्चू वानखडे याची हत्त्या करणाऱ्यांची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांना ज्यांच्यावर संशय आहेत, त्या सर्वांचे मोबाईल फोन बंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.