अमरावती - पावसाळा लागला की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर पडणारे जीवघेणे खड्डे हे नित्याचेच झाले आहे. यंदाही या पावसाळ्यात जीवघेणे खड्डे पडले असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहे. मात्र यामध्ये खड्डे बुजवण्यासाठी आयआरबीने चक्क पाऊस सुरू असतानाचा मुहूर्त शोधला आहे. कारण पाऊस सुरू असताना पाणी साचलेल्या खड्ड्यातच मटेरियल टाकून खड्डे बुजवण्याचा अजब प्रकार समोर आला आहे. दरम्यान बुजवलेले खड्डे काही तासातच उघडे पडत असल्याने मग ही डागडुजी नेमकी कशासाठी असा सवाल देखील उपस्थित झाला आहे. त्यामुळे आयआरबी नावापुरते खड्डे बुजवत तर नाही ना असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अमरावती-नागपुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. तिवसा ते मोझरी या सहा किलोमीटरमध्ये तर ठिकठिकाणी खड्यांनी आपला संसार थाटला आहे. या जीवघेण्या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहन चालकांना खड्डा किती मोठा आहे याचा अंदाजही येत नाही. त्यामुळे अपघाताला आमंत्रण देणारे हे खड्डे आहेत. एकीकडे दरोरोज लाखो रुपये टोल वसुली करणारी आयआरबी कंपनी पावसाळ्यापूर्वी खड्डे का बुजवत नाही. जर खड्डे बुजवत असेल तर मग एवढे मोठे जीवघेणे खड्डे पुन्हा डोकं का वर काढतात असा, प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. दरम्यान महामार्गावर पडलेले खड्डे हे सध्या तात्पुरत्या स्वरूपात बुजवले जात आहे. वाहनांचा अपघात होऊ नये म्हणून हे खड्डे आम्ही बुजवत आहे. परंतु पाऊस गेल्यानंतर चांगल्या पद्धतीने त्याचे तयार पॅचेस करून खड्डे बुजवणार असल्याची प्रतिक्रिया आयआरबीचे जनरल मॅनेजर चंद्रशेखर भागवत यांनी दिली आहे.