अमरावती - शिर्डी-पुरी या रेल्वेगाडीत उत्तर प्रदेश येथील एका दिव्यांग अभियंत्याचा गळा आवळून खून झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी ही गाडी बडनेरा रेल्वे स्थानकावर आल्यानंतर दिव्यांगांच्या डब्यामध्ये संबंधित व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.
विशेषकुमार शिरपाल(30) असे मृत पावलेल्या अभियंत्याचे नाव असून, तो उत्तर प्रदेशातील नेह धडा येथील रहिवासी आहे. सोमवारी शिर्डी वरुन पुरीला जाणारी रेल्वे गाडी अकोला स्थानकावर आल्यानंतर रेल्वे सुरक्षा रक्षकाला दिव्यांगांच्या डब्यामध्ये मृतदेह आढळला. ही गाडी अकोला स्थानकावरून सुटल्यामुळे याबाबत अधिक माहिती बडनेरा रेल्वे पोलिसांना देण्यात आली.
हेही वाचा 'क्राईम कॅपिटल' नागपूरमध्ये आईसह चिमुरड्याचा बत्त्याने ठेचून खून
संबंधित गाडी बडनेरा रेल्वे स्थानकावर येताच स्थानिक पोलिसांनी या डब्याची पाहणी करून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केला. घटनास्थळी एक मोबाईल सापडला असून, रेल्वे पोलिसांनी या फोनद्वारे मृतकाच्या संबंधितांशी संपर्क साधला. मृत व्यक्ती उत्तर प्रदेशातील नेहदरा येथील रहिवासी असून, नवी मुंबईतील बेलापूर येथे एका इलेक्ट्रॉनिक कंपनीत तो अभियंता म्हणून नोकरीला असल्याची माहिती मिळाली आहे. बडनेरा रेल्वे पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून संबंधित प्रकरण अकोला रेल्वे पोलिसांकडे पुढील तपासासाठी दिले आहे.