अमरावती - भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे व जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन संचालनालयातर्फे रविवारी हेरिटेज सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत ७५ सायकलस्वारांनी सहभाग नोंदवला. वेलकम पॉईंटपासून सुरू झालेली रॅली यावली शहीदपर्यंत व परत अमरावतीकडे येऊन श्री शिवाजी महाविद्यालयात या रॅलीचा समारोप करण्यात आला. पर्यटन संचालनालयाचे अमरावती प्रादेशिक कार्यालय, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय तसेच अमरावती टूर्स अँड ट्रॅव्हल्स असोसिएशन, मैत्री संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हेरिटेज सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
रॅलीदरम्यान कोविड नियमांचे पालन -
या रॅलीदरम्यान, कोविड नियमावलींचे काटेकोर पालन करण्यात आले. पहिले नोंदणी करणाऱ्या 75 सायकलपटूंनाच सहभाग देण्यात आला होता. कोविडला प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने मास्क, सुरक्षित सामाजिक अंतर आणि सॅनिटायझर या त्रिसुत्रीचे पालन रॅलीत करण्यात आले. अमरावती शहरातील वेलकम पॉईंटपासून सकाळी सातच्या सुमारास रॅलीचा प्रारंभ झाला. वेलकम पॉईंटपासून यावली शहीद ते परत अमरावती असा 60 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यात आला. यावली शहीद या गावाचे स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानिमित्त यावली शहीदपर्यंत जाऊन रॅली पुन्हा अमरावतीत परत आली. तसेच श्री शिवाजी महाविद्यालयात या रॅलीचा समारोप करण्यात आला, अशी माहिती आयोजकामतर्फे देण्यात आली.
जागतिक पर्यटन दिवस का साजरा केला जातो? -
जागतिक पर्यटन दिवसाची सुरुवात 1970 पासून संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेद्वारे केली गेली. 27 सप्टेंबर 1980 रोजी पहिला जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला. पर्यटनाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी आजच्या दिवशी जगभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. नवनवीन ठिकाणी भेटी देणं, स्थानिक गोष्टींची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देते.