अमरावती - जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकींची रणधुमाळी सुरू झाली आहे. ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारांना नामनिर्देशन अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र जोडण्याची सक्ती असल्याने इच्छुक उमेदवारांची तारांबळ उडाली आहे. जातवैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी हजारो इच्छुकांच्या अमरावतीच्या समाज कल्याण कार्यालयात रांगाच-रांगा लागल्या आहेत.
ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी येत्या १३ तारखेपर्यंतच नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. त्यातच आज धुलीवंदनची सुटी आल्याने समाज कल्याण कार्यालय बंद राहणार आहे. दरोरोज येणाऱ्या लोकांची गर्दी पाहता त्या तुलनेत लोकांना पावत्या कमी प्रमाणात मिळत आहेत. पहिल्या दिवशी आल्यानंतर आधी सहा तास रांगेत उभे राहून त्यानंतर कागदपत्रांची तपासणी एका ठिकाणी केली जाते. त्यानंतर त्यांना टोकन दिल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी पावती मिळवण्यासाठी लांब रांगेत उभे राहून प्रतीक्षा करावी लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
हेही वाचा - शेतीच्या वाटणीवरून वडिलांनी केलेल्या मारहाणीत मुलाचा मृत्यू
अमरावती जिल्ह्यातील ५२६ गावातील ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. जात वैधता प्रमाण पत्र यायला सहापेक्षा जास्त महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्राची अट रद्द करावी, अशी मागणी इच्छुक उमेदवार करत आहेत. सध्या कोरोना विषाणूचे सावट असताना. नागरिकांनी जमावाने राहू नये, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. परंतु, जातवैधता प्रमाण पत्र मिळवण्यासाठी मात्र लोकांना जमावाने राहण्याशिवाय पर्याय नाही. ज्या जुन्या राजकीय मंडळींकडे जात वैधता प्रमाणपत्र आहे. त्याच लोकांना पुन्हा निवडणूक लढवायची संधी मिळणार असून नवख्यांना मात्र निवडणुकीपासून वंचित रहावे लागत असल्याची प्रतिक्रिया लोकांनी दिली.
हेही वाचा - अमरावतीत अवैध गावठी दारूवर छापा; 3 लाखांचा मुद्देमाल जप्त