अमरावती - जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या बुधवारी 134 वर पोहोचली आहे. अशातही अमरावतीकर मात्र रस्त्यावर गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे. रेड झोन असणाऱ्या अमरावती शहरात आता जवळपास साठ टक्के बाजारपेठ खुली झाली आहे. त्यामुळे, शहरात सर्वत्र गर्दी वाढलेली दिसत आहे.
बुधवारी एकाच दिवशी जिल्ह्यात 19 कोरोना रुग्ण आढळून आले. हा आतापर्यंतचा अमरावतीतील कोरोना रुग्णांचा उच्चांक आहे. गाडगेनगर, विदर्भ महाविद्यालय परिसर हा भाग वगळता मासानगंज, पठाण चौक, कोल्हापुरी गेट, पार्वती, बडनेरा, उत्तम नगर, वडाळी असा जवळपास शहराच्या भोवतालचा सर्व परिसर कोरोनाने व्यापला आहे. या भागांत कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. असे असतानाही अमरावतीकर मात्र कुठलीही भीती न बाळगता सर्रास घराबाहेर निघत आहेत.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने सकाळी 9 ते दुपारी तीन वाजेपर्यंत लॉकडाऊनमध्ये सूट दिली गेली आहे. या कालावधीत कपड्याची दुकाने वगळता संपूर्ण बाजारपेठ खुली झाली आहे. शहरातील गाडगे नगर, पंचवटी, इर्विन चौक, जयस्तंभ चौक, राजकमल चौक, राजापेठ चौक, नवाथे चौक या सर्वच महत्त्वाच्या चौकांमध्ये नेहमीसारखी गर्दी होताना दिसत आहे. शहरातील रस्त्यांची कामेही सुरू झाली असून राजकमल चौक ते राजापेठ आणि यशोदा नगर ते दस्तुर नगर चौक परिसरातील रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे.